Breaking News

कलोते धरणपात्रात धनिकांचे अतिक्रमण ; पाटबंधारे विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष

खोपोली : प्रतिनिधी

खालापूर तालुक्यातील कलोते मोकाशी धरण पात्रात धनिकांनी अतिक्रमण करून बांधलेले बंगलो फार्महाऊस आणि धोकादायक नौकानयन याकडे पाटबंधारे विभागाचा कानाडोळा होत असून, धरणासाठी जमिनी दिलेला शेतकरी मात्र उपरा झाला आहे.

खालापूर तालुक्यातील चार महत्वाच्या धरणापैकी कलोते मोकाशी धरण दुसर्‍या क्रमांकाचे मोठे धरण आहे. खालापूर तालुक्याची सिंचनाची गरज भागविता यावी, यासाठी 1976च्या दरम्यान हे धरण बांधण्यात आले. त्यासाठी कलोते ग्रामस्थांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. धरण पुर्णत्वास आले आणि खालापूर तालुक्यात उन्हाळी शेती बहरली. मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर धरण असल्यामुळे धरणालगतच्या  मोकळ्या जमिनीवर धनदांडग्यांची नजर न जाईल, तर नवलच. एकेक करता धरण परिसरात शंभरच्या आसपास बंगले आणि फार्महाऊस उभे राहिले आहेत.निसर्गाच्या सान्निध्यात आणि निवांतपणा यामुळे सिनेस्टारदेखील धरण परिसराच्या प्रेमात पडून जागा खरेदी केल्या आहेत. त्यातील   काही धनिकांनी खाजगी मालमत्ता असल्यासारखे बांधकाम करीत थेट धरण क्षेत्रात प्रवेश केला आहे. सिमेंटचे पक्के बांधकाम करीत धोकादायक पातळीसुद्धा ओलांडली आहे. शनिवार, रविवार आणि  सुट्टीचे दिवस पाहून पर्यटकांना हे फार्महाऊस भाड्याने दिले जात असून, तेथे बोटींगची सोय करण्यात आली आहे.  कलोते मोकाशी धरणपात्रातील अतिक्रमणांविरोधात स्थानिकांनी पाटंबधारे विभागाकडे तक्रारी करूनही अतिक्रमण व बोटिंगला पायबंद बसला नाही. धरण परिसरात प्रवेश निषिद्ध असताना दिवसाढवळ्या होणार्‍या अतिक्रमणांमुळे नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय अशी शंका स्थानिकांना येत आहे.

– कलोते मोकाशी धरणपात्राची मोजणी करण्यात आली होती. माथा पातळी तपासली असता धरणात अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमण करणार्‍यांना नोटीस पाठविण्यात आली आहे, तसेच बेकायदा बोटिंग विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात माहिती दिली असून, बोटिंग सुरू असताना स्थानिकांनी माहिती दिल्यास नक्कीच कारवाई होईल.

-आर. ङी. चव्हाण,

शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग-भिलवले

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply