इमर्जन्सी सेवा सुरू
उरण : बातमीदार
कोलकाता येथील रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि. 17) डॉक्टरांनी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. त्याला पाठिंबा म्हणून उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनही उरणमधील दवाखाने बंद ठेवणार असून फक्त इमर्जन्सी सेवा सुरू ठेवणार असल्याची माहिती प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केली आहे. कलकत्ता येथील 80 वर्षीय रुग्णाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. यानंतर तेथील डॉक्टरांवर सुमारे 200 लोकांच्या जमावाने प्राणघात हल्ला केला. समाजातील अशा वाईट प्रवृत्तीमुळे डॉक्टर व रुग्ण यांच्यात तेढ निर्माण होऊन त्याचा आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी डॉक्टरांनी देशव्यापी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या बंदला पाठिंबा देत उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशननेही दवाखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी सर्व दवाखाने म्हणजे ओपीडी सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. फक्त इमर्जन्सी सेवा सुरू राहणार आहे, मात्र या दिवशी असोसिएशनचे सर्व डॉक्टर इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात सेवा देण्यासाठी हजर राहून रुग्णांना सेवा देण्याचे काम करतील. तरी यावेळी होणार्या गैरसोयीबद्दल असोसिएशनने दिलगिरी व्यक्त करीत सहकार्य करण्याचे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष संजीव म्हात्रे यांनी केले आहे.