रसायनी : प्रतिनिधी
लोधिवली येथिल धिरूभाई अंबानी हास्पिटल बंद न करता सुरळीत चालू राहण्यासाठी लोधिवली ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामपंचायत परिसरात सर्व नागरिक एकत्र येऊन ग्रामपंचायतीमार्फत धिरुभाई अंबानी हास्पिटल बंद होऊ नये, असा ठराव बहुमताने पास करून घेतला. कै. धिरुभाई अंबानी यांनी लोधिवली येथील शेतकर्यांच्या जमिनी खरेदी करून या ठिकाणी कामगारांसाठी सुंदर वसाहत, शाळा आणि हॉस्पिटल बांधले आहे. जमीन खरेदी करतेवेळी कंपनीने शेतकर्यांना काही आश्वासने दिली होती. आम्ही तुमच्या मुलांना शिक्षण देऊ, शाळेच्या फीमध्ये सवलत देऊ, मुलांना नोकरीमध्ये संधी देऊ, हॉस्पिटलच्या बिलामध्ये सवलत देऊ, त्याचप्रमाणे शेतकर्यांना हास्पिटल कार्डही दिलेले आहेत. सद्यस्थितीत कर्जत, खोपोली, खालापूर, चौक, रसायनी व इतर आजूबाजूच्या परिसरात धिरुभाई अंबानी हॉस्पिटल एवढे सुंदर प्रशस्त हास्पिटल नसल्यामुळे या परिसरातील भरपूर पेशंट या हास्पिटलला येत असतात. त्याचप्रमाणे धिरुभाई अंबानी हास्पिटल हे जुना मुंबई-पुणे हायवेलगत येत आहे. जुना मुंबई-पुणे हायवेला दररोज लहान मोठे अपघात होत असतात. आजूबाजूला चांगले हास्पिटल नसल्यामुळे पेशंटला अंबानी हास्पिटल येथे आणले जाते, परंतु सद्यस्थितीत हॉस्पिटलमध्ये पुरेसे डाक्टर व स्टाफ नसल्यामुळे पेशंटवर उपचार होत नाहीत.पेशंटना पुढे पनवेल-मुंबई व इतरत्र पाठविले जाते. त्यामुळे काही पेशंट प्रवासातच दगावत आहेत. त्या ठिकाणी हास्पिटलला चांगले डाक्टर भरा. स्टाफ भरा व कोणत्याही कामगाराला कामावरून काढू नये आणि जर यापुढे काम करणार्या कामगारांना काढले, तर आंदोलन केले जाईल, असा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.