खारघर : प्रतिनिधी
सायन पनवेल महामार्गावरील काळुंद्रे येथील नव्या पुलाचे काम अनेक दिवसांपासून रखडले होते. या ठिकाणी असलेल्या ब्रिटिशकालीन पुलावरूनच दोन्ही मार्गाची वाहतूक सुरू होती. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागत होत्या. मागील वर्षभरापासून या ठिकाणची वाहतूक कोंडी ही प्रवाशांना मनस्ताप ठरत होती. शुक्रवारी नवीन पूल वाहतुकीस सुरू करण्यात आला. पनवेल शहरातून कोकण, तसेच गोव्याकडे जाताना या मार्गाचा वापर होतो. जुना मुंबई-पुणे महामार्ग म्हणून ओळखल्या जाणार्या या मार्गावर पुण्याकडे जाणार्या वाहनांची मोठी वर्दळ असते. एमएसआरडीसीच्या माध्यमातून हे काम हाती घेण्यात आले आहे. सायन पनवेल महामार्गावर 197 कोटी खर्च करून कळंबोली ते शेडुंग दरम्यान रुंदीकरण करण्यात आले आहे. या कामांमध्ये खांदा कॉलनी हयवे उड्डाणपूल, गाढी नदी पूल व काळुंद्रे उड्डाणपुलाचा समावेश आहे. या मार्गावरील सर्व उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू झाल्याने या मार्गावर वाहतूक सुरळीत झाली आहे.