पनवेल ः वार्ताहर
नव्याने इमारत उभारत असताना इमारत उभारण्यासाठी लागणारे साहित्य रस्त्यातून वाहणार्या गटारावरच टाकणार्या बांधकाम व्यावसायिकांना आज (दि. 17) पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तंबी दिली आहे. तातडीने सदर साहित्य हटविण्यास तसेच तुटलेली गटारे व स्लॅब बांधून देण्यासही संबंधितांना सांगण्यात आले आहे.
शहरातील चिंतामणी मंगल कार्यालयासमोर नव्याने इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी लागणारे विविध साहित्य तसेच रेती, सिमेंट, ब्लॉक व इतर गोष्टी या तेथून वाहणार्या गटारावरच टाकण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी गटार बंदिस्त करून त्याच्यावर सामान टाकण्यात आले आहे, तर काही ठिकाणी उघड्या गटारावर सदर माल टाकल्याने वाहत्या पाण्याला अडथळा निर्माण होतो. त्याचप्रमाणे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास सदर बाहेर असलेला माल हा गटारात जाऊन गटार तुंबू शकते. हे पाणी रस्त्यावर पसरून परिसरातील रहिवाशांच्या घरातसुद्धा जाऊ शकते.
याबाबतच्या तक्रारी परिसरातील नागरिकांनी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्याकडे केल्या होत्या. यासंदर्भात त्यांनी तातडीने सदर ठिकाणी भेट देऊन संबंधित बांधकाम व्यावसायिकाला याबाबतची कल्पना दिली व तातडीने सदर माल एका बाजूला हटवून तुटलेली गटारे व्यवस्थित करून द्यावीत, तसेच आत पडलेली रेती व इतर साहित्य आणि गाळ त्वरित काढून द्यावा. पाण्याचा निचरा योग्य दिशेने होईल याकडे लक्ष द्यावे, अशी तंबी त्यांनी दिली असून याबाबत पनवेल महानगरपालिकेच्या संबंधित अधिकार्यांनाही या कामाची माहिती देऊन कारवाई करण्यास सांगितले आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी उपमहापौर विक्रांत पाटील यांचे आभार मानले आहेत.