पनवेल : वार्ताहर
सोमवारी कळंबोली येथे सुधागड स्कूलसमोर हातगाडीवर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली. रात्री उशिरा खिडुकपाडा जवळील मोकळ्या जागेत सीआरपीएफच्या सहकार्याने ही वस्तू निकामी करण्यात आली. तिचे अवशेष रासायनिक विश्लेषणासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, एटीएसचे प्रमुख देवेन भारती यांनी आज कळंबोली येथे बॉम्बसदृश घटनेचा आढावा घेतला. त्याचबरोबर त्यांची मुंबईची टीम तपासकामी पनवेलमध्ये दाखल झाली. नवी मुंबई गुन्हे शाखेने आरोपींचा शोध सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता नाकाबंदी केली असून ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे, तसेच कोबिंग ऑपरेशनची तयारी करण्यात आल्याचे समजते.
सोमवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही बॉम्बसदृश वस्तू सुधागड स्कूलच्या अरुण विश्वकर्मा या सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आली. त्यानंतर मुख्याध्यापक इकबाल इनामदार यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. बॉम्बसदृश वस्तू असल्याची खात्री पटल्यानंतर कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी नवी मुंबई बॉम्बशोधक पथकाला पाचारण केले. स्मृती गार्डनच्या बाजूला रात्री साडेनऊ वाजेपर्यंत ही वस्तू निकामी करण्याचे काम नवी मुंबई पोलीस करीत होते, परंतु आतमध्ये मजबूत सिमेंट काँक्रीट असल्याने ते फोडण्यात यश आले नाही. शेवटी 10 वाजता तळेगाव येथून सीआरपीएफचे पथक या ठिकाणी आले. त्यांच्याकडे असलेल्या स्कॅनर मशीनने ही वस्तू स्कॅन करण्यात आली आणि ती बॉम्बसदृश असल्याचे स्पष्ट होताच हे बॉक्स निकामी करण्यासाठी खिडुकपाडाच्या बाजूला असलेल्या मोकळा भूखंडावर नेण्यात आले. रात्री उशिरा हे संशयास्पद वस्तू यशस्वीपणे निकामी करण्यात आली. तब्बल 10 तासानंतर पोलीस यंत्रणांनी हलकासा श्वास घेतला. दरम्यान, सायंकाळी पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी घटनास्थळाला भेट दिली. मंगळवारी सकाळी कळंबोलीत तपास यंत्रणा जोरात कामाला लागली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विजय कादबाने, कोंडीराम पोपेरे, कोल्हटकर यांच्यासह सर्व अधिकारी आणि त्यांचे पथक तपासात व्यस्त झाले. सीसीटीव्ही फुटेजपासून, टॉवर लोकेशन, मोबाईल कंपन्यांचे सीडीआर याव्यतिरिक्त इतर तांत्रिक बाबींची तपासणी सुरू करण्यात आली आहे. नवी मुंबई एटीएसने कालपासूनच आपली तपास यंत्रणा कामाला लावली. दरम्यान, मंगळवारी 12 वाजण्याच्या सुमारास राज्याचे एटीएसप्रमुख देवेन भारती कळंबोलीत आले. कळंबोली पोलीस ठाण्यात पोलीस आयुक्त संजय कुमार आणि एटीएसप्रमुखांनी संयुक्त आढावा घेतल्याचे समजते. तपास यंत्रणांना सूचना देऊन भारती दीड वाजण्याच्या सुमारास पुन्हा मुंबईला रवाना झाले. मुंबई एटीएसची टीम घटनेचा सुगावा काढण्यासाठी कळंबोलीत दाखल झाल्याचे समजते.
कळंबोलीत सापडलेली संशयास्पद वस्तू बॉम्बसदृश असल्याचेच जवळपास स्पष्ट झालेले आहे, परंतु रासायनिक विश्लेषणानंतरच ही बाब अधिकृतरीत्या स्पष्ट करता येईल, असे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. या बॉक्समध्ये स्फोटके होती का, त्याचबरोबर त्यांची तीव्रता किती होती या सर्व गोष्टी अहवाल आल्यानंतरच समजू शकतील, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. दरम्यान, त्यांच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांची पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली आहेत. काही ठिकाणी नाका बंदी करण्यात आली आहे, तर कोबिंग ऑपरेशन सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.