अलिबाग : प्रतिनिधी
दोन वर्षे दिवाळीवर करोनाचे सावट होते. त्यामुळे बाजारपेठेत फारसा उत्साह नव्हता. यंदा मात्र बाजारपेठांवरील मंदीचे मळभ दूर झाले आहे. दिवाळीचा सण दोन दिवसांवर आलाय. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. रायगड जिल्ह्यातील बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकाने सजली आहेत. दिवाळीनिमित्त खास सवलत, मोफत भेटवस्तू तसेच फायनान्स ऑफर्स देवू केल्या आहेत. ग्राहक या ऑफर्सचा पुरेपूर लाभ घेत आहेत. रेडीमेड कपडे, दागिने, दुचाकी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाइल, लॅपटॉप, एलईडी, घरखरेदी, गृहोपयोगी वस्तू यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे. शिवाय पूजेसाठी लागणारी फुले, आकाशकंदील, फटाके, रांगोळी, मिठाई, फराळ आदी खरेदीची बाजारपेठेत लगबग दिसत आहे. कपडा मार्केट चांगलेच तेजीत आले आहेत. नवनव्या फॅशनच्या कपड्यांनी दुकाने सजली आहेत. तयार कपड्यांवर विशेष ऑफर्स दिल्या आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर टीव्ही, फ्रीज, वातानुकूलित यंत्र, ओव्हन, सीडी, एलसीडी, संगणक यासारख्या वस्तू खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. वाहनांची आगाऊ नोंदणी मोठ्या संख्येने होत आहे. मोबाइलसह इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी झिरो डाऊन पेमेंट, ईएमआय, शून्य टक्के व्याजासह कर्ज आदी सुविधाही देण्यात आल्या आहेत. मिठाई, ड्रायफ्रुट तसेच तयार फराळ खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. रस्त्यांवर लावलेल्या स्टॉलवर आकाशकंदील, रांगोळी, फुले, पणत्या, फटाके आदी दिवाळीनिमित्त लागणार्या वस्तूंची खरेदीसाठी रात्री उशीरापर्यंत ग्राहकांची वर्दळ होती. यावेळी दरवर्षीच्या तुलनेत अधिक स्टॉल्स रस्त्यावर पहायला मिळत आहेत. गेल्या काही वर्षात ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. अँमेझॉन, फ्लिपकाडर्र्, मिशो, आजीओ, मिंन्त्रा यासारख्या कंपन्यांनी दिवाळी सवलत योजनांचा भडीमार सुरु केला आहे. त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाइन खरेदीवरही भर दिला आहे.