यजमान इंग्लंडवर साकारला दणदणीत विजय
लॉडर्स : वृत्तसंस्था
पाच वेळा विश्वविजेतेपद मिळवणार्या ऑस्ट्रेलियाने विश्वचषक 2019मध्ये यजमान इंग्लंडवर 64 धावांनी विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. कर्णधार अॅरॉन फिंचच्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 285 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बेन स्टोक्सने एकाकी 89 धावांची झुंज दिली, पण जेसन बेहेरनडॉर्फने टिपलेल्या पाच बळींमुळे इंग्लंडला केवळ 221 धावांपर्यंतच मजल मारता आली. 12 गुणांसह उपांत्य फेरीचे तिकीट मिळवणारा ऑस्ट्रेलिया पहिला संघ ठरला आहे; तर पराभवामुळे इंग्लंडच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
286 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना व्हिन्स (0), रूट (8) आणि मॉर्गन (4) हे तिघे झटपट बाद झाले. जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स या दोघांनी इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण बेअरस्टोदेखील 27 धावा काढून माघारी परतला. स्टोक्सने जोस बटलरच्या साथीने चांगली खेळी केली. बटलर मोठा फटका मारताना 25 धावांवर बाद झाला. दुसरीकडे स्टोक्सने फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याने दमदार अर्धशतक ठोकले. 89 धावांवर खेळत असताना मिचेल स्टार्कच्या यॉर्कर चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. त्याने 8 चौकार आणि 2 षटकार खेचले. त्यानंतर आलेल्या ख्रिस वोक्स (26) आणि आदिल रशीद (25) यांनी काही काळ खेळपट्टी सांभाळून पराजय पुढे ढकलला, मात्र अखेर बेहरनडॉर्फच्या भेदक मार्यापुढे त्यांचा डाव 221 धावांवर आटोपला. बेहेरनडॉर्फने 5, स्टार्कने 4 तर स्टोयनीसने 1 बळी टिपला.
तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अॅरोन फिंच या दोघांनी दमदार फलंदाजी करीत भक्कम सलामी दिली. 123 धावांच्या सलामी भागीदारीनंतर वॉर्नर बाद झाला. त्याने 61 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. त्याच्यानंतर फिंचने ख्वाजाच्या साथीने डाव पुढे नेला, पण ख्वाजा 23 धावा करून माघारी परतला. स्टोक्सने त्याच्या त्रिफळा उडवला. फिंचने दमदार शतक ठोकले. त्याने 116 चेंडूंत 100 धावा केल्या. यात 11 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. मोठा फटका खेळताना तो झेलबाद झाला.
स्टीव्ह स्मिथने एक बाजू लावून धरली, पण दुसर्या बाजूने त्याला कोणी साथ देऊ शकले नाही. धोकादायक मॅक्सवेल 12 धावा काढून बाद झाला. पाठोपाठ स्टॉयनीसदेखील धावचीत होऊन माघारी परतला. अखेर शेवटच्या टप्प्यात स्मिथ फटकेबाजीच्या प्रयत्नात बाद झाला. त्याने 38 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला 285 धावांपर्यंत मजल मारून दिली. इंग्लंडकडून वोक्सने 2, तर आर्चर, वुड, स्टोक्स आणि अली यांनी प्रत्येकी 1 बळी टिपला.
RamPrahar – The Panvel Daily Paper