कर्जत ः बातमीदार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या व एपीएल तसेच केशरी शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ लवकरच देण्यात येणार आहे, अशी माहिती कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली. एपीएल (केशरी)मधील ज्या लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत तसेच तालुक्यातील शेतकरी योजनेंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळत नाही, अशा एपीएल शिधापत्रिकांची तालुक्यातील संख्या 14 हजार 850 एवढी आहे. या लाभार्थ्यांना सद्यस्थितीत शासनाकडून कोणत्याही प्रकारच्या सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत नसल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना दोन महिन्यांच्या कालावधीकरिता सवलतीच्या दराने अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.