बर्मिंगहॅमवर महामुकाबला होण्याची शक्यता
बर्मिंगहम : वृत्तसंस्था
न्यूझीलंड संघाचा पराभव करीत यजमान इंग्लंडने उपांत्य सामन्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीतील चार संघाची नावे जवळजवळ ठरली आहेत. ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे उपांत्य फेरीतील चार संघ जवळजवळ निश्चित झाले आहेत. न्यूझलंड नेटरनरेटमुळे उपांत्य फेरीत गेल्याचे बोलले जात आहे. मात्र, क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नाही. त्यामुळे जर पाकिस्तान संघाने बांग्लादेशचा मोठ्या फरकाने पराभव केला तर उपांत्य फेरीत पोहचण्याची संधी असणार आहे. विराट अॅण्ड कंपनीला उपांत्य फेरीत कोणाशी दोन हात करावे लागणार आहेत, हा प्रश्न सध्या भारतीयांना पडला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील साखळी सामन्यानंतर भारताचा उपांत्य फेरीतील सामना कोणाशी होणार हे ठरेल. जर अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला तर भारतीय संघाला उपांत्य फेरीत इंग्लंडशी सामना करावा लागणार आहे. हा सामना 11 जुलै रोजी होणार आहे. जर आपल्या अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि भारताने श्रीलंकेला धूळ चारली. तर उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे.
भारतीय संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये असून कोणत्याही संघाचा पराभव करण्याची क्षमचा त्यांच्याकडे आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी लढल्यास अंतिम सामन्याचे तिकीट भारतीय संघाला सहजासहजी मिळू शकते. त्यामुळे शनिवारी दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला मात देणे आणि भारतीय संघाने लंकेचा पराभव करणे गरजेचे आहे. इंग्लंडच्या तुलनेत न्यूझीलंडचा संघ कुमकुवत वाटतोय. अखेरच्या तिन्ही साखळी सामन्यात न्यूझीलंडला पराभवचा सामना करावा लागला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये संतुलन नसल्याचा फटका न्यूझीलंडला बसला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत भारताला तुलनेन सोपे आव्हान असणार आहे. पण भारताचा सामना इंग्लंडशी झाला तर भारतापुढे तगडे आव्हान असेल.
उपांत्य फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याची शक्यता नाहीच. भारत सध्या गुणतालिकेत दुसर्या स्थानावर आहे. साखळी फेरीत भारताचा अखेरचा सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. श्रीलंकेविरुद्धचा सामना भारताने जिंकला आणि आणि ऑस्ट्रेलियाचा अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हरली तर भारत 15 गुणांनिशी पहिल्या स्थानवर जाईल. अखेरच्या सामन्यात भारत हरला आणि ऑस्ट्रेलिया जिंकली, तरीही हे दोन संघ उपांत्य फेरीत समोरासमोर येणार नाहीत. उपांत्य फेरीसाठी भारतासमोर न्यूझीलंड आणि इंग्लंड या पैकी एका संघाचे आव्हान असणार आहे.