पनवेल/कळंबोळी ः बातमीदार – कळंबोली सर्कल ते नावडे रस्त्यावरील अतिक्रमणे निष्कासन करण्याची महानगरपालिकेने मोहीम हाती घेतली आहे. रस्त्यावर अतिक्रमण करून रहदारीला अडथळा करणार्या अनधिकृत टपर्या, गॅरेजेस, बेकायदा भाडे वसूल करणारी शेड, हॉटेल अशी दोन्ही बाजूची सुमारे 100 अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली. सायंकाळी 5 वाजता अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे फूडलँड कंपनीजवळ कारवाई स्थगित करण्यात आली.
अतिक्रमणे केल्यामुळे ट्रॅफिक जॅम होणे, अपघात होणे अशा समस्या वाढत आहेत. यावर वेळोवेळी कारवाई केली जात आहे. यापुढे देखील ही कारवाई सुरू राहील, असे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले. यासाठी चारही प्रभागातील प्रभाग अधिकारी व कर्मचारी आणि पोलीस अशा मिळून 100 जणांनी कारवाईत सहभाग घेतला. आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशाने शहरात पावसाळ्यात देखील व्यावसायिक अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे तोडण्यात येत आहेत.