पनवेल ः वार्ताहर – रायगड जिल्हा कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कर्जत तालुक्यातील मोठे वेणगाव येथे वर्षा सहल व कवी संमेलन संपन्न झाले. या कवी संमेलनाचे उद्घाटन वेणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अभिषेक गायकर यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा नमिता किर, केंद्रीय जनसंपर्क प्रमुख प्रा. एल. बी. पाटील, उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, दक्षिण रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष संजय गुंजाळ, समन्वयक अ. वि. जंगम, जिल्हा प्रतिनिधी गणेश कोळी, शिवानी साहित्य ग्रुपचे संतोष महाडेश्वर, कर्जत कोमसापचे अध्यक्ष अॅड. गोपाळ शेळके, अलिबाग कोमसापच्या अध्यक्षा पूजा वैशंपायन, अॅड. संतोष जुईकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रायगडसह मुंबई, ठाणे येथून आलेल्या साहित्यिकांनी वेणगाव जवळील वदप येथील धबधब्यावर जाऊन निसर्गाचा आनंद लुटला. या कवी संमेलन व वर्षा सहलीचे आयोजन उत्तर रायगड कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आले.
उपस्थित असलेल्या कवींनी पाऊस या विषयावर आपल्या कविता सादर केल्या. पहिल्या पावसाचा सुगंध तो बेभान करतो, हुरहूर पावसाची, पावसाची चाहूल, वसुंधरेच्या भेटीला, अरे अरे पावसा, चहा माझ्या हो गावाला, या विषयांवर अरूण म्हात्रे, रेखा जगताप, प्रा. सुकुमार पाटील, सुरेखा गायकवाड, धनंजय गद्रे, नलिनी पाटील, मैथिली भोपी, श्रीधर पाटील, पूजा वैशंपायन, विजय घोसाळकर, डॉ. रघुनाथ पवार, ज्योती शिंदे, मारूती बागडे, संध्या दिवेकर, समीर काकडे, प्रकाश सोनावणे, बाळासाहेब तोरसकर, बाबूजी धोत्रे आदी कवींसह व्यासपीठावरील प्रमुख पाहुण्यांनीही आपल्या समाजातील सर्व विषयांना वाहिलेल्या कविता सादर केल्या.
या कवी संमेलनात सुमारे 50 कवींनी आपल्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन सताणे यांनी केले तर आभार कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी मानले.