Sunday , February 5 2023
Breaking News

पनवेल महापालिका हद्दीत कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले

पनवेल : वार्ताहर

कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यात पनवेल महानगरपालिकेला यश आले आहे. पालिका क्षेत्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98 टक्क्यांवर पोहचले आहेत. महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर व आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेला कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. सध्याच्या घडीला पालिका क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी रेटदेखील नियंत्रणात आल्याने रुग्ण वाढीला ब्रेक लागला आहे.

सध्याच्या घडीला पालिका क्षेत्रात 85 हजार 899 रुग्ण कोविडवर मात करून पूर्णपणे बरे झाले आहेत. एकेकाळी पालिका क्षेत्रात सक्रिय रुग्णांचा आकडा हजारोंच्या संख्येने होता. त्याच्यावर पालिकेला नियंत्रण मिळविण्यास यश आले असून केवळ 403 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेतदेखील पनवेल मनपाने उत्कृष्ट कामगिरी केली होती. वैद्यकीय अधिकार्‍यांनीही महापौर व आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय जाणीवपूर्वक परिस्थिती हाताळली. दुसरी लाट थोपविण्यात पालिकेला यश आले असले तरी पालिकेने संभाव्य तिसर्‍या लाटेची सर्वतोपरी तयारी केली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे कळंबोलीत 650 बेड्चे जम्बो कोविड केअर सेंटर सिडकोच्या मदतीने तयार झाले आहे. त्यामुळे भविष्यात तिसरी लाट आली तरी पालिका प्रशासन तयार असल्याचे आयुक्तांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. खाजगी कोविड रुग्णालयांनाही पालिकेतर्फे सूचना करण्यात आल्या आहेत.

लसीकरणही वेगात सुरू

कोविडची साथ नियंत्रणात आणण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण हे धोरण पनवेल पालिकेने अवलंबले असून सध्याच्या घडीला दररोज 15 हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. पालिका क्षेत्रात सहा लाख नागरिकांचे लसीकरण पालिकेमार्फत पूर्ण झाले आहे.

दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी संभाव्य तिसर्‍या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पालिका प्रशासन त्याकरिता सज्ज असले तरी तिसरी लाट थोपविणे नागरिकांच्याही हातात आहे. कोविडच्या नियमांचे तंतोतंत पालन केल्यास कोरोनावर नियंत्रण मिळविण्यास यश येईल.

 -गणेश देशमुख, आयुक्त, महापालिका, पनवेल

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply