Breaking News

आम्ही सुरक्षेशिवाय फिरणारे लोक -फडणवीस

लोणावळा : प्रतिनिधी
सुरक्षा काढणे किंवा ठेवणे यामुळे आमच्यावर काही परिणाम होत नाही. आम्हाला त्याची काही चिंता नाही. आम्ही सुरक्षेशिवाय फिरणारे लोक आहोत. आहे तेवढी सुरक्षा पुरेशी आहे व ती ठेवली नाही तरीदेखील आम्हाला काही अडचण नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 11) येथे आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. फडणवीस यांच्याबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेतही राज्य सरकारकडून कपात करण्यात आली आहे. याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावार फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
फडणवीस म्हणाले, मी वर्षानुवर्षे अगदी प्रदेशाध्यक्ष असतानाही एक साधा सुरक्षा रक्षक माझ्याजवळ नव्हता. मी गडचिरोलीला जायचो, सिरोंच्यालादेखील जायचो, सगळीकडे जायचो. आजदेखील मला एकही सुरक्षा रक्षक दिला नाही तरी मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरू शकतो. त्यामुळे आमची त्यावर कुठलीही तक्रार नाही, आक्षेप नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, जे काही आमचे सुरक्षा रक्षक काढले आहेत त्यांचा वापर तुम्ही महिलांच्या सुरक्षिततेसाठी करा. सुरक्षा कपातीसारख्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी भंडारासारख्या घटेनवर अधिक लक्ष सरकारने दिले पाहिजे.
निवडणुकीसाठी शिवसेनेची नौटंकी
शिवसेनेच्या बदलत्या भूमिकेबद्दल फडणवीस म्हणाले, मला याचा आनंद आहे की, गुजराती समाजाला निवडणुकीकरिता का होईना जवळ करण्याचा प्रयत्न शिवसेना करीत आहे. निवडणुकीच्या व्यतिरिक्त गुजराती समाजाशी संवाद ठेवला तर शेवटी तेही आपले नागरिक आहेत. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनला शिवसेना विरोध करीत आहे. दुसरीकडे गुजराती समाजाला जवळ करू असे म्हणत आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे कोणी जवळ येत नाही. तुमच्या कृतींमुळे लोक जवळ येतात. निवडणुका आल्यानंतर आता हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेदेखील जनाब बाळासाहेब ठाकरे झाले आहेत. उर्दुमध्ये शिवसेनेचे कॅलेंडर निघत आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने नाटक, नौटंकी चालली आहे, पण लोकांना समजते ही नौटंकी कशासाठी आहे, असे म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply