कर्जत : बातमीदार
नेरळ-माथेरान
घाटरस्त्यात गुरुवारी (दि. 25) दुपारी शेकडो वर्षांपूर्वींचे झाड रस्त्यावरच कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु दोन तास वाहतूक ठप्प होती. त्यामुळे घाटरस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वन विभागाच्या सहाकार्याने दोन तासांनंतर ही वाहतूक सुरळीत करण्यात आली.
आठवडाभर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा बरसण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवस सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी जमीन खचून झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अशाच प्रकारे गुरुवारी दुपारी नेरळ-माथेरान घाटरस्त्यात असलेले शेकडो वर्षांपूर्वीचे आंब्याचे झाड कोसळले. झाड भलेमोठे असल्याने सुमारे दोन तास वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला. या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आल्यानंतर अधिकार्यांनी जेसीबी आणून जेसीबीच्या सहाय्याने कोसळलेले झाड बाजूला केले आणि रस्ता मोकळा करून दिला. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.