रोहे ः प्रतिनिधी
लोखंडी कच्चा माल घेऊन जाणारा ट्रक निडी (ता. रोहा) येथील वीज वितरण कंपनीच्या डिपीवर धडकल्याने मंगळवारी (दि. 24) दुपारपासून मेढा, यशवंतखार व निडी तर्फे अष्टमी या विभागातील 20 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. नागोठणे येथून लोखंडी कच्चा माल घेऊन जाणारा ट्रक मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास निडी येथील डिपीवर आदळल्याने विजेचे खांब कोलमडले. तसेच डिपी नादुरूस्त झाली. त्यामुळे या डिपीवर अवलंबून असलेल्या रोहा तालुक्यातील सानेगाव, यशवंतखार, वावे, डोंगरी, शेणवई, लक्ष्मीनगर, झोळांबे, कापरे, भातसई, निडी यांच्यासह मेढा विभागातील 20 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. वीज वितरण कंपनीने डिपी दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेतले, मात्र पावसामुळे त्यात अडथळा निर्माण होत होता. वीज कर्मचार्यांच्या प्रयत्नांमुळे संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला.