Breaking News

समाधानकारक पावसामुळे बळीराजा सुखावला ; रायगडात 85 टक्के भात लावणी पूर्ण

अलिबाग : प्रतिनिधी

सर्वत्र पाऊस समाधानकारक पडत असल्यामुळे रायगड  जिल्ह्यात भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यात भात लावणीची 85 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. 

रायगड जिल्ह्यात एक लाख 23 हजार हेक्टर भात लागवडीचे क्षेत्र आहे. यापैकी  यंदा एक लाख चार हजार हेक्टरवर भात लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  यापैकी आतापर्यंत  87 हजार हेक्टर क्षेत्रावर भात लावणी करण्यात आली आहे. काही दिवस पावसाने दडी मारल्यामुळे लावणीची कामे खोळंबली होती. आता पुन्हा पाऊस सुरू झाल्यामुळे जिल्ह्यात भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत जिल्ह्यात भात लावणीचे काम

पूर्ण होईल.

जया व सुवर्णा या जातीच्या बियाणांना पर्याय म्हणून जिल्ह्यात कर्जत 5 आणि कर्जत 7 या सुधारित वाणाची लागवड व्हावी यासाठी कृषी विभागामार्फत प्रयत्न करण्यात आले होते. अडीच हजार क्विंटल सुधारित बियाणांचे वाटप करण्यात आले आहे. शेतकर्‍यांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चांगला पाऊस पडत असल्यामुळे भात रोपांची वाढही वेगाने होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

-समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे भात लावणीची कामे वेगात सुरू आहेत. 85 टक्के क्षेत्रावर भात लावणी झाली. रोपांची वाढ चांगली झाली. कुठेही भात रोपांवर रोगाचा प्रादुर्भाव झालेला नाही. येत्या चार दिवसांत लावणीची कामे 100 टक्के पूर्ण होतील. -पांडुरंग शेळके, कृषी अधीक्षक

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply