Breaking News

आध्यात्माशी जुळावे नाते

अपयशाचा, संकटांचा, ताणाचा सामना करण्यात भारतीय इतके कमी का पडताहेत असा प्रश्नही या निमित्ताने पुन्हा एकदा विचारला जात आहे. आधी आपण निव्वळ शेतकर्‍यांच्या आत्महत्यांबद्दल वाचत होतो. अलीकडच्या काळात आर्थिक कोंडीतून होणार्‍या आत्महत्या शहरी भागांमध्येही हलके-हलके डोके वर काढू लागल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना तर आपण अनेक वर्षे तोंड देतोच आहोत.

देशभरात विखुरलेल्या ‘कॅफे कॉफी डे’ या साखळी कॉफी शॉप कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व्ही. जी. सिद्धार्थ सोमवारी सायंकाळी संशयास्पदरीतीने मंगळूर नजीकच्या एका नदीवरील पुलावरून बेपत्ता झाल्याने देशातील उद्योग विश्वात खळबळ निर्माण झाली. बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह नदीत तरंगताना आढळून आल्याने त्यांनी आत्महत्या केली असण्याची शक्यता अखेर खरी ठरली. उद्योजक म्हणून अपयशी ठरल्याचे दु:ख व्यक्त करणारे पत्र त्यांनी बेपत्ता होण्यापूर्वी कर्मचार्‍यांना लिहिले होते. यात ताण असह्य झाल्याची भावनाही व्यक्त करण्यात आली आहे. सिद्धार्थ यांचे अशातर्‍हेने व्यावसायिक अपयशाने खचून जाऊन टोकाचे पाऊल उचलणे सगळ्यांनाच स्तंभित करून गेले आहे. सीसीडीचे स्वत:चे असे एक वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. तिथला साधेपणा, कर्मचार्‍यांच्या वर्तनातली आत्मीयता आणि ग्राहकांना हवा तितका वेळ तिथे निवांत बसू देण्याची त्यांनी रुजवलेली संस्कृती यामुळे गेल्या काही वर्षांत अनेकांसाठी सीसीडी हे भेटीगाठींचे ठिकाण बनले आहे. सिद्धार्थ हे इतरही अनेक स्टार्ट-अप कंपन्यांचे मार्गदर्शक होते. इन्फोसिस, माइंडट्रीसारख्या

कंपन्यांमध्येही त्यांची गुंतवणूक होती. आपल्या साध्या परंतु अतिशय सुसंस्कृत व्यक्तिमत्वाने अनेकांची मने जिंकणार्‍या या उद्योजकावर अशातर्‍हेने अपयशी ठरल्याने आयुष्य संपवण्याची वेळ यावी याने अनेक जण स्तंभित झाले आहेत. जीवनातील नकारात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक असलेला मनाचा खंबीरपणा आपण गमावू लागलो आहोत का? भारत ही तर जणु काही अध्यात्माची मायभूमी गणली जाते. अनेक जण जगण्याचा, जीवनाचा खरा अर्थ शोधत जगाच्या कानाकोपर्‍यातून इथवर येऊन पोहोचतात. मग तोच भारत देश आता जगभरातील आत्महत्यांची राजधानी का बनू पाहतो आहे? एकीकडे याच देशात लाखो लोक दारिद्य्ररेषेखालचे अपेक्षितांचे जिणे मोठ्या धैर्याने संघर्षाला तोंड देत जगताना आढळतात, तर त्याच वेळेस तुलनेने सुरक्षित आयुष्य जगत आलेली माणसे मात्र तात्कालिक अपयशाने पुरती डगमगून जाताना दिसतात. का होत असावे असे? चकचकाटी, चंगळवादी जगण्यात मन नैराश्याने झाकोळून जाण्याची शक्यता कैक पटींनी वाढते असा इशारा तर मानसोपचार तज्ज्ञ गेली अनेक वर्षे देतच आले आहेत. त्या सार्‍यात आता समाजमाध्यमे व ऑनलाइन जगण्यातील भ्रामक, फसव्या संपर्क-संबंधांतून येणार्‍या ताणाची भरच पडली आहे. आपल्या कुटुंबाशी जोडलेले रहा, जगणे साधे ठेवा, छंद-आवडी जोपासा, दैनंदिन पातळीवर व्यायाम, छंद, कुटुंबासमवेतच्या गप्पाटप्पा यांकरिता वेळ काढा. आपले जिणे आपण जितके अधिकाधिक निसर्गाच्या सान्निध्यातले ठेवू, तितकी आपली चित्तवृत्ती निसर्गाशी तादात्म्य पावेल. उत्पत्ती, स्थिती आणि लय हा निसर्गाचा नियम आहे. सजीवांपैकी कुणीही त्याला अपवाद नाही. परंतु या वास्तवाला सामोरे जाऊन आपल्या हाती आलेल्या या जगण्याचे समतोलातून सुंदर, सुरेल गाणे करण्याची खबरदारी आपली आपणच घ्यायची असते. आपल्या शिक्षणातूनही हा मार्ग शिकवला जाण्याची गरज आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply