Breaking News

नेरूळ जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात

लवकरच नेरूळ ते भाऊचा धक्का जलवाहतुकीचा प्रारंभ

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

सिडकोच्या जल वाहतूक प्रकल्पांतर्गत लवकरच नेरूळ ते भाऊचा धक्कादरम्यान कॅटामरान सेवा सुरू होणार आहे. तसेच या प्रकल्पाअंतर्गत सिडकोतर्फे नेरूळ येथे उभारण्यात येत असलेल्या जेट्टीचेही काम अंतिम टप्प्यात आले आहे. नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सिडकोतर्फे नेरूळ-सीवूड्स-उरण रेल्वे प्रकल्पाअंतर्गत उपनगरी रेल्वे सेवेचा उरणपर्यंत विस्तार, नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत चार मेट्रो मार्गांचा विकास इ. प्रकल्प साकारण्यात येत आहेत. या प्रकल्पांबरोबरच नवी मुंबई ते मुंबई दरम्यानच्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी सिडकोतर्फे पर्यावरणपूरक, तुलनेने कमी खर्चाचा, अधिक प्रवासी वहन क्षमता असणारा व अल्प कालावधीत विकसित करता येण्यासारखा जल वाहतुकीचा पर्याय विकसित करण्यात येत आहे. या अंतर्गत सिडकोतर्फे नेरूळ 3.05 हेक्टर क्षेत्रावर येथे जलवाहतूक टर्मिनल प्रस्तावित आहे. टर्मिनलअंतर्गत पाइल्ड प्लॅटफॉर्मवर टर्मिनलला जोडणारा रस्ता, टर्मिनलची इमारत, पार्किंग लॉट, युटीलिटीज् (इलेक्ट्रिकल पॅनेल रूम, वॉटर टँक, एसटीपी इ.) नेव्हीगेशनल एरिआ आणि मार्शलिंग एरिआ विकसित करण्याचे काम सुरू आहे. जलवाहतूक टर्मिनलअंतर्गत उभारण्यात येणार्‍या जेट्टीचे काम प्रगतीपथावर असून ते अंतिम टप्प्यात आले आहे.

राज्य शासनातर्फे मुंबईच्या पूर्व किनारपट्टी प्रदेशात जल वाहतुकीकरिता सोयी सुविधा विकसित करण्याकरिता नोड्ल एजन्सी म्हणून महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाची नियुक्ती करण्यात आली आहे. यानुसार महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि सिडको ही महामंडळे आपापल्या कार्यक्षेत्रात सागरी वाहतूक सुविधा विकसित करीत आहेत. त्यानुसार सिडको व मेरिटाइम बोर्ड यांच्या माध्यमातून वाशी, नेरूळ व बेलापूर येथील खाडीकिनारी जेट्टी उभारणे प्रस्तावित आहे. त्यांपैकी नेरूळ येथील जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. एप्रिल 2020 पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे, तर मे 2020 मध्ये प्रत्यक्ष जलवाहतूक सेवा सुरू करणे नियोजित आहे. या प्रकल्पाकरिता सिडकोतर्फे रु. 111 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

जलद प्रवासासाठी उपयुक्त सेवा

कॅटामरान सेवेमुळे नेरूळ ते भाऊचा धक्का हा प्रवास सागरी मार्गे केवळ 30 मिनिटांत करता येणे शक्य होणार आहे. तसेच दक्षिण मुंबईतून प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठीही ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply