Breaking News

राष्ट्रवादीचे सुनील तटकरे भाजप प्रदेशाध्यक्षांच्या बंगल्यावर

मुंबई : प्रतिनिधी

एकामागोमाग एक नेते, आमदार सोडून चालल्यामुळे अस्वस्थ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतेत भर टाकणारी बातमी आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार सुनील तटकरे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांच्या भेटीसाठी त्यांच्या बंगल्यावर गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तेही भाजप प्रवेशाची चाचपणी करताहेत की काय, या चर्चेला उधाण आले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येणे जवळपास अशक्य असल्याने या पक्षातील नेते भाजप, शिवसेनेच्या तंबूत डेरेदाखल होऊ लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला याचा मोठा फटका बसला आहे. पक्षांतराचा हा लोंढा थोपवायचा कसा, अशा चिंतेत राष्ट्रवादीचे नेतृत्व असताना आणखी एक मोठी बातमी थडकली आहे.

रायगडचे खासदार सुनील तटकरे मंगळवारी (दि. 30) रात्री उशिरा चंद्रकांत पाटलांच्या मुंबईतील शासकीय बंगल्यावर गेले होते. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये येणार्‍या आमदारांची बैठक सुरू असताना तटकरे तेथे हजर झाले. त्यांना पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. यावरून अनावश्यक चर्चा होणार हे लक्षात येताच ते तत्काळ माघारी फिरले, मात्र तोपर्यंत उपस्थितांनी त्यांना मोबाइलच्या कॅमेर्‍यात टिपले. विकासकामांसंदर्भात भेट

घेण्यास गेलो असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात असले तरी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply