Breaking News

भारतीय संघ हरला, पण बुमराने पराक्रम गाजवला!

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था

जसप्रीत बुमराने पुन्हा एकदा त्याला जगातील सर्वोत्तम गोलंदाज का म्हटले जाते हे सिद्ध केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात बुमराहने 16 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाला असला, तरी बुमराने एका विक्रमाला गवसणी घातली. फिरकीपटू आर. अश्विन याच्यानंतर टी-20मध्ये बळींचे अर्धशतक करणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला.

127 धावांचे माफक लक्ष्य असूनही अखेरपर्यंत रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी-20 सामन्यात 3 विकेट राखून विजय मिळवताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ग्लेन मॅक्सवेल (56) आणि डी अ‍ॅर्सी शॉर्ट (37) यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. जसप्रीत बुमराहने 19व्या षटकात पुन्हा एकदा उपयुक्त गोलंदाजी करताना जगातील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे सिद्ध केले, पण अखेरच्या षटकात उमेश यादवला विजय मिळवण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियाने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला.

तत्पूर्वी, रोहित शर्मा (5) माघारी परतल्यानंतर लोकेश राहुल आणि विराट कोहली यांनी भारताच्या डावाला आकार दिला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना संघात झोकात पुनरागमन केले. कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये 500 धावांचा पल्ला ओलांडला आणि अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. राहुलने 36 चेंडूंत 50 धावा केल्या. दिनेश कार्तिक व कृणाल पांड्या काही चमक न दाखवता माघारी परतले. धोनी एका बाजूने टिकून खेळत होता, परंतु त्यालाही मोठे फटके मारता येत नव्हते. भारताला 20 षटकांत 126 धावांपर्यंतच मजल मारता आली.

बुमराने या सामन्यात तीन विकेट घेत आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये अर्धशतक पूर्ण केले. अश्विननंतर टी-20मध्ये 50 विकेट्स घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. अश्विनच्या नावावर 46 सामन्यांत 52; तर बुमराहच्या नावावर 41 सामन्यांत 51 विकेट्स आहेत.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply