विशाखापट्टणम : वृत्तसंस्था
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. या सामन्यातील ‘टुकूटुकू’ फलंदाजीमुळे धोनी हा टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक संथगतीने फलंदाजी करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने अवघ्या 126 धावा केल्या होत्या. केएल राहुल आणि कर्णधार विराट कोहली वगळता भारताचा एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. धोनीने काही प्रमाणात डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने संथ फलंदाजी केली. 18व्या षटकात धोनीने केवळ एक धाव काढली. 19व्या षटकात त्याला दोनच धावा करता आल्या; तर अखेरच्या षटकात एका षटकारापलीकडे फारसे काही करता आले नाही. त्याने 37 चेंडू खेळून केवळ 29 धावा केल्या. त्यामुळे अखेरच्या 12 षटकांत भारतीय संघाला फक्त 61 धावा करता आल्या.
टी-20 क्रिकेटमध्ये 35हून जास्त चेंडू खेळून कमी धावा काढणारा धोनी हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. या यादीत रवींद्र जडेजा पहिल्या स्थानावर आहे. जडेजाने 2009मध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स स्टेडियमवर झालेल्या टी-20 सामन्यात 35 चेंडूंत अवघ्या 25 धावा केल्या होत्या.