सर्वांना सहकार्याचे सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

चंद्रपूर : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न पाहिले असून त्याअनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात विविध सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत. जलसाक्षरता अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतींच्या सहकार्यातून जिल्हा पाणीदार करण्यासाठी जलसत्याग्रह चळवळ उभी करण्यात येणार असून याकरिता सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या 72व्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन जिल्ह्याधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. या सोहळ्याला खासदार सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर, चंद्रपूर विधानसभेचे आमदार नानाभाऊ श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर व जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, स्वातंत्र्यसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, शहिदांनी प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्याचा मंगल कलश आपल्या हाती दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे या दिवशी आपल्याला काय अधिकार मिळाले याचा विचार न करता भारत निर्माणाकरिता कर्तव्याचा विचार करणे आवश्यक आहे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या देशात स्वतःचा परिचय भारत देशाच्या नावाने द्यायचा महत्त्वपूर्ण निर्णय पंतप्रधानांनी घेतला.
महाराष्ट्र सरकारने अनेक योजना राबवल्या असून बीपीएलमध्ये नाव नसेल तरीही दोन-तीन रुपये किलोने अन्नधान्याचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संपूर्ण राज्य चूलमुक्त-धूरमुक्त करून गॅसयुक्त करण्याकरिता अभियान राबवले आहे. जनसामान्यांना गॅस कनेक्शन देण्यात राज्यात आपला जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. येत्या आठ दिवसांत चंद्रपूर जिल्हा गॅसयुक्त झालेला राज्यातील पहिला जिल्हा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येकाच्या शेतापर्यंत पाणी पोहचून आपला जिल्हा येत्या पाच वर्षांत पाणीदार व्हावा याकरिता संकल्प केला असून 4 ऑगस्ट रोजी जलपुरुष राजेंद्र सिंह व सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांच्या उपस्थितीत जलसाक्षरता अभियानाला गती देण्यासाठी संकल्प केला असून जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतींच्या सहभागाने जलसत्याग्रह चळवळ सुरू करण्यात येणार आहे. याकरिता सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.