शासनाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत प्रवासी रस्त्यावर

पनवेल : प्रतिनिधी
कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारकडून राज्यात लॉकडाऊन करण्यात आलेला असताना लोकांनी गर्दी करू नये म्हणून जमावबंदी आदेशही जारी करण्यात आलेले आहेत. नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले असले तरीपण या सुचनेकडे दुर्लक्ष करीत मुंबई-पुण्यातील लोक सोमवारी (दि. 23) नेहमीप्रमाणे रस्त्यावर उतरले. सरकारकडून सर्व प्रयत्न सुरू असतानाच मुंबई-पुण्यातील नागरिक त्याला प्रतिसाद न देता बेपर्वाईने वागत असल्याने पोलिसांनी पुण्याकडे जाणारा एक्स्प्रेस वे बंद केला होता. कोरोनाचे रुग्ण मुंबईत वाढत असून तीन जणांचा मृत्यूही झाला आहे. राज्य सरकारकडून नागरिकांना बाहेर न पडण्याचे वारंवार सांगितले जात आहे. रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यास चांगला प्रतिसाद ही मिळाला. रात्रीपासून जमावबंदीही लागू करण्यात आली होती. सोमवारी मात्र सर्व नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले. बाहेरगावी जाण्यासाठी घराबाहेर पडणार्यांची संख्या वाढत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरही सकाळपासूनच वाहनांची गर्दी दिसून आली. त्यामुळे कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर यांनी सकाळी साडेअकरा वाजता पुण्याकडे जाणारा मार्ग बंद करून अत्यावश्यक सेवा असणार्यांचे ओळखपत्र पाहून त्यांना सोडण्यात आले. तर इतरांना यू-टर्न मारावा लागला. रेल्वे आणि बसेस बंद असतानाही सोमवारी मुंबईकर नेहमीप्रमाणेच घराबाहेर पडले. अनेकांनी आपली खासगी वाहने बाहेर काढून कर्जत, पुणे आणि कसार्याच्या दिशेने निघाले. त्यामुळे महामार्गावर वाहनांची गर्दी वाढल्यावर पोलिसांनी अत्यावश्यक सेवा असणार्यांचे ओळखपत्र पाहून त्यांना सोडले आणि इतर नागरिकांना परत पाठवण्यास सुरुवात केली. या वेळी नागरिक आपली वाहने सोडण्यासाठी पोलिसांशी हुज्जत घालताना दिसत होते. पुण्याकडे कोणतीही गाडी सोडण्यात येणार नसल्याचे या वेळी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. नंतर पुन्हा एक्स्प्रेस वे सुरू करण्यात आला.