Breaking News

ग्रामपंचायत कर्मचार्यांची आता पनवेल मनपात होणार नियुक्ती ; 297 जणांना कायम करण्याचे निर्देश

मुंबई : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिका हद्दीतील 297 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना तत्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी मंगळवारी (दि. 20) येथे नगरविकास विभागाला दिले.

ना. योगेश सागर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे समायोजन पनवेल महानगरपालिकेत करण्याबाबत कर्मचार्‍यांची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडली. आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, 22 जानेवारी 2019 रोजी कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शासननियुक्त समितीने या कर्मचार्‍यांच्या समायोजनाचा प्रस्ताव सर्वानुमते मान्य केलेला आहे, तसेच महानगरपालिकेच्या प्रस्तावित आकृतीबंधामध्ये या कर्मचार्‍यांच्या समायोजनासाठी महानगरपालिकेने पदनियुक्ती प्रस्तावित केलेली असून, यासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही व्हावी, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

नगरविकास विभागाचे उपसचिव श्री. जाधव यांनी सांगितले की, सर्व कागदपत्रे तपासण्याचे काम आयुक्त तथा संचालक, नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्याकडे सुरू आहे. यावर आयुक्त तथा संचालकांचे प्रतिनिधी व उपसंचालक श्री. पाटणकर यांनी तपासणी पूर्ण झाल्याचे बैठकीत नमूद केले. तपासणीनुसार 320 पैकी एक कर्मचारी सेवानिवृत्त झाला असून, 22 कर्मचार्‍यांच्या वेतन खात्यांचा मेळ लागत नाही. उर्वरित 297 कर्मचार्‍यांना समायोजित करण्यास सकारात्मक अहवाल नगरविकास विभागाला सादर केल्याचे पाटणकर यांनी नमूद केले.

यावर ना. योगेश सागर यांनी 297 कर्मचार्‍यांना तत्काळ महानगरपालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश नगरविकास विभागाचे उपसचिव श्री. जाधव यांना दिले. या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, तसेच नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply