नागोठणे : प्रतिनिधी
पावसाचा जोर काही अंशी कमी होऊन ऊन पडावयास सुरुवात झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर टाकलेल्या दगडसदृश मातीने आपला रंग दाखवण्यास प्रारंभ केला असून, महामार्ग सध्या धुरळ्यात हरवला असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी ठेकेदाराने पावडरमिश्रित दगडे टाकून मलमपट्टी केली होती. आता ऊन पडावयास प्रारंभ झाल्याने अवजड वाहनांमुळे टाकलेल्या दगडांची पावडर होऊन ती रस्त्यावर उडत असल्यामुळे हा महामार्ग सध्या धुळीत न्हाऊन जात आहे. याचा सर्वात जास्त फटका नागोठणे ते वाकण परिसरात दुचाकीस्वार तसेच पादचार्यांना होत आहे. हा धुरळा डोळ्यात आणि नाकात जात असल्याने श्वसनाचे तसेच सर्दीच्या रुग्णांत वाढ झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. दोनचार दिवसांत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारे प्रवासी व त्यांच्या वाहनांच्या संख्येतसुद्धा प्रचंड प्रमाणात वाढ होणार असल्याने ठेकेदाराकडून या महामार्गाचे डांबरीकरण करण्याचे काम तातडीने हातात घेतले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.