कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार
तालुक्यात पूर्वी एक-दोन कोरोना रुग्ण आढळत होते, आता त्यात झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी (दि. 5) एका दिवसात चक्क 27 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. फार्महाऊसेस आणि त्यानंतर सुरू झालेल्या लहान-मोठ्या रिसॉर्टमुळे कर्जतची आता पर्यटन तालुका म्हणून ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे शनिवार-रविवार, तसेच सुट्टीच्या दिवशी तालुक्यातील फार्महाऊसेस आणि माथेरानला असंख्य पर्यटक येतात. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी असंख्य पर्यटक कर्जत तालुक्यात आले होते. त्यानंतर बुधवारी एकाच दिवशी तब्बल 27 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, झपाट्याने वाढणार्या रुग्णवाढीमुळे कर्जत तालुका प्रशासन सतर्क झाले असून, खबरदारी म्हणून आरोग्य यंत्रणेकडून बेडची उपलब्धता तपासली जात आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी कर्जत शहरातील उपजिल्हा रुग्णालय आरक्षित आहे. त्या ठिकाणी 75 बेडची व्यवस्था असून, हे सर्व बेड सेंट्रल ऑक्सिजन व्यवस्थेने तयार आहेत. त्यापैकी सात बेड आयसीयूसाठी आरक्षित आहेत. आवश्यकता वाटल्यास कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आणखी 50 बेडची व्यवस्था होऊ शकते. अशी माहिती कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांनी दिली आहे.