विजयानंतरही स्वित्झर्लंडचे भवितव्य मात्र अधांतरी
बाकू, रोम ः वृत्तसंस्था
युरो चषक फुटबॉल स्पर्धेत झालेल्या दोन सामन्यांत अनुक्रमे इटली आणि स्वित्झर्लंड या संघांनी विजय मिळवला, मात्र स्वित्झर्लंडचे भवितव्य अद्यापही अधांतरी असून वेल्सने पराभवानंतरही सरस गोलफरकाच्या बळावर बाद फेरीतील स्थान सुनिश्चित केले.
बाकू ऑलिम्पिक स्टेडियमवर झालेल्या स्वित्झर्लंडविरुद्ध टर्की यांच्यातील लढतीत झेरदान शकिरीची कमाल पाहायला मिळाली. शकिरीने केलेल्या दोन गोलला हॅरिस सेफेरोव्हिचच्या एका गोलची साथ लाभल्यामुळे स्वित्झर्लंडने टर्कीवर 3-1 असे वर्चस्व गाजवले. टर्कीकडून इरफान कॅव्हेसीने एकमेव गोल केला. टर्की तिन्ही लढतींमध्ये पराभूत झाल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
रोम येथे झालेल्या अन्य सामन्यात आतापर्यंत दमदार कामगिरी करणार्या इटलीने विजयाची हॅट्ट्रिक करताना वेल्सवर 1-0 अशी मात केली. मॅटिओ पेसीनाने 29व्या मिनिटाला इटलीसाठी एकमेव गोल नोंदवला. इटलीने गटात सर्वाधिक नऊ गुण कमावले. गेल्या युरो चषकात उपांत्य फेरी गाठणार्या वेल्सने यंदाही बाद फेरीत प्रवेश केला आहे.