पनवेल ः प्रतिनिधी
सीकेपी समाजातील तरुणांनी नोकरी देणारे बनण्यासाठी व्यवसायात येणे आवश्यक आहे. त्यासाठी पनवेल सीकेपी समाजाने व्यवसायिकांना समाजरत्न पुरस्कार देऊन चांगली सुरुवात केली असल्याचे अखिल भारतीय सीकेपी मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष समीर गुप्ते यांनी पनवेल येथे रविवारी (दि. 25) श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा आणि सीकेपी समाजरत्न पुरस्कार सोहळ्यात बोलताना सांगितले.
पनवेलच्या पुरातन लक्ष्मी-नारायण मंदिरात 98 वर्षांची परंपरा जपून श्रीकृष्ण जन्मोत्सव पारंपारिक पध्दतीने शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून मोठ्या उत्साहाने रविवारी साजरा करण्यात आला. कुंभार आळीतील एकाच कुटुंबाकडून ही मूर्ती 98 वर्षे आणली जात आहे. या वर्षीपासून संस्थेने समाजातील उत्कृष्ट कार्य करणार्या व्यक्तींना पनवेल सीकेपी समाजरत्न पुरस्कार देण्यास सुरुवात केली.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सीकेपी फूड फेस्टचे संस्थापक आणि अखिल भारतीय सीकेपी मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष समीर गुप्ते, उपाध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे पनवेल संस्थेचे अध्यक्ष अशीष गुप्ते, उपाध्यक्ष आशुतोष दिघे आदी उपस्थित होते. यावेळी समीर गुप्ते यांनी समाजातील तरुणांना नोकरी करण्यापेक्षा उद्योजक बनून नोकर्या देण्याचे काम करा, असा सल्ला दिला.
पनवेल सीकेपी समाजरत्न पुरस्कार पहिल्या वर्षी सुप्रसिद्ध बिल्डर राजू (किशोर) गुप्ते, उद्योजक प्रदीप गुप्ते आणि विधिज्ञ विरेंद्र कुलकर्णी यांना देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकृष्ण चित्रे, समीर शृंगारपुरे, राजेश राजे, गिरीश गडकरी, योगेश राजे, संपदा देशपांडे, अनघा गुप्ते, प्रीति खानविलकर आणि निरंजन गुप्ते यांनी विशेष मेहनत घेतली.