रोहे ः प्रतिनिधी : विकासकामाच्या नावाखाली नगर परिषदेने शहरात खोदलेले खड्डेे तातडीने भरावेत, यासाठी रोहा शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यानुसार मंगळवारी (दि. 18) सकाळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने खड्डेे भरण्यासाठी निवेदन दिले आहे.
शिवसेना शहरप्रमुख दीपक तेंडुलकर, नगरसेविका समीक्षा बामणे, शिवसेना अल्पसंख्याक प्रमुख उस्मान रोहेकर, युवा अधिकारी राजेश काफरे, मनोज लांजेकर, अनिता शेडगे, आदित्य कोंडाळकर, चंद्रकांत कडू यांसह शिवसैनिकांनी मंगळवारी मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यात शहरातील खड्डे तातडीने भरावेत, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गेली दोन वर्षे रोहा आणि अष्टमी शहरात नगर परिषदेने भुयारी गटारे व वीजवाहिन्या टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदले आहेत. नुकतीच पावसास सुरुवात झाली असून, शाळा तसेच महाविद्यालयेसुद्धा सुरू झाली आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल आणि पाणी साचल्यामुळे विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून चालणे मुश्कील झाले आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वारंवार अपघात होत आहेत. एकंदरच नगर परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नगर परिषदेकडून नागरी सुविधा उपलब्ध होणे हा करदात्या नागरिकांचा हक्कच आहे. त्यासाठी रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजविण्याची कार्यवाही करावी, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभारेल, असे निवेदनात म्हटले आहे.
भुयारी गटारे व भूमी अंतर्गत वीजवाहिन्या टाकण्यासाठी नगर परिषदेने मोठ्या प्रमाणात रस्ते खोदले आहेत. ते रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, अन्यथा शिवसेनेच्या वतीने रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभारण्यात येईल.
-दीपक तेंडुलकर, शिवसेना शहरप्रमुख, रोहा