कर्जत : बातमीदार
तालुक्यातील उमरोली, वाकस, जामरुंग आणि रजपे या चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका शनिवारी (दि. 31) होत आहेत. त्यापैकी वाकस ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली असून, अन्य तीन ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचपदासाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. कर्जत तालुक्यातील वाकस ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच म्हणून सुदर्शना संजय तांबोळी या बिनविरोध निवडून आल्या असून तेथे सदस्य पदाच्या दोन जागांसाठी चार उमेदवारांत लढत होत आहे. जामरुंग या नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीमधील सदस्यपदाच्या नऊपैकी दोन जागा बिनविरोध झाल्याने तेथे आता 14 उमेदवारांत चुरशीची लढत होत आहे. जामरुंगमध्ये थेट सरपंचपदासाठी जयवंत एकनाथ पिंपरकर आणि दत्तात्रय भाऊ पिंपरकर यांच्यात थेट लढत होत आहे. त्याच भागातील नव्याने अस्तित्वात आलेल्या रजपे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या सात जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात आहेत. तेथील थेट सरपंचपदासाठी माजी सरपंच दीपाली प्रमोद पिंगळे यांची लढत जि. प. च्या माजी सदस्या रेश्मा सोपान भालीवडे यांच्याशी होत आहे. रेल्वे पट्ट्यातील उमरोली ग्रामपंचायतीमधील 13पैकी सहा सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता तेथे सात जागांसाठी निवडणूक होत आहे. तेथील थेट सरपंचपदासाठी तिरंगी लढत होत आहे. ठमी नामदेव सांबरे, उषा दत्तात्रय वाघमारे आणि मीना सखाराम पिरकर या तीन उमेदवार थेट सरपंचपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.या सर्व ग्रामपंचायतींसाठी शनिवारी मतदान घेण्यात येणार असून, मतमोजणी 3 सप्टेंबर रोजी होणार आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात मतमोजणी होणार असल्याने पोलीस दलदेखील अधिक सतर्क झाले आहे.