Breaking News

भाजपच सर्वांत मोठा पक्ष : फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी
जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालावर बोलताना माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यात मोठा पक्ष आम्हीच (भाजप) ठरलो आहोत, असे म्हटले आहे. एकूण जे राजकीय गणित आहे ते नव्याने तयार झाले आहे. त्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागेल, असेही त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
फडणवीस म्हणाले की, नागपूर जिल्हा परिषद अनेक वर्षे आमच्याकडे होती. कधी सत्तेत असताना होती, तर कधी विरोधी पक्षात असताना होती. मागील वेळी आमच्या 21 जागा आल्या होत्या. शिवसेनेच्या आठ-नऊ जागा होत्या. आम्ही एकत्रितपणे सत्तेत आलो होतो. या वेळी आम्ही वेगळे लढलो आणि काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढली. आमच्या जागा 21वरून 15वर आल्या, तर शिवसेनेच्या सात जागा कमी झाल्या.
राजकीय गणित बदलले असतानाही सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत सगळ्यात मोठा पक्ष आम्हीच ठरलो. आमच्या 103 जागा आल्या. त्यामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत सगळ्यात जास्त जागा आमच्या आल्या, पण राजकीय गणित बदलले असल्याने आम्हाला नव्याने तयारी करावी लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने निवडणूक लागल्याने तयारी झाली नव्हती, पण पुढच्या वेळी तयारी करू, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
…तर राज ठाकरेंसोबत युती!
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत बैठक झाली का, असे विचारले असता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आमच्या भेटी अनेक वेळा झाल्या आहेत, पण त्यांच्या आणि आमच्या विचारांत अंतर आहे. जोपर्यंत विचार व कार्यपद्धतीत अंतर आहे, तोपर्यंत आम्ही एकत्र येऊ शकत नाही. त्यांचे विचार आणि कार्यपद्धती बदलली, तर भविष्यात विचार करू शकतो. ते व्यापक विचाराने चालणार असतील, तर त्या वेळी विचार केला जाईल.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply