पनवेल : वार्ताहर – सध्या माझे वय 83 असून गेल्या 20 वर्षापासून आजारी असल्याने व्हिल चेअरवरच मी घरात आहे. आज कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी प्रत्येकाने घरी राहणे गरजेचे आहे. मी गेल्या 20 वर्षांपासून घरातच आहे. मग तुम्ही एक दोन महिने घरात राहू शकत नाहीत का? असा सवालच शहरातील ज्येष्ठ नागरिक गिरीजा पावसकर यांनी समस्त पनवेलकरांना केला आहे.
शहरातील शिवाजी चौक येथे पनवेल सिटी सेंटर येथे गिरीजा पावसकर या आपल्या कुटुंबियांसह राहतात. गेल्या 20 वर्षापासून त्या आजारी असल्याने व्हील चेअरवरच घरच्या घरी फिरणे असते. सध्याचे वय 83 आहे. कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावाला रोखण्यासाठी सर्व वैद्यकीय विभागातर्फे तसेच शासनातर्फे घराबाहेर नागरिकांनी पडू नये. घरातच रहा, जेव्हा अत्यावश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडा असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. असे असतानाही अनेक जण छोट्या-मोठ्या कारणासाठी घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे ही मालिका खंडीत न होता वाढत चालली आहे. याचा पसार शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात व देशात होत आहे. याची जाण लोकांना नाही आहे. या सर्व बाबींमुळे गिरीजा पावसकर या व्यथित झाल्या आहेत.
माझ्या सारख्या अनेक जण व्हील चेअरवर किंवा बिछान्यावर झोपून असतात. परंतु ते आनंदाने आपले जीवन जगत आहेत. या रोगाला आपल्या देशातून घालवायचे असेल तर सर्वांनी घरातच राहणे हा एकमेव पर्याय आहे. याला सर्वांनी अंगीकारणे गरजेचे आहे. तरी सर्वांनी घरातच रहा व कोरोनाला पळवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.