Breaking News

आली गौराई अंगणी… आज गणरायांसह गौरीचे विसर्जन

पनवेल ः बातमीदार

ज्येष्ठ व कनिष्ठा गौरीचे पनवेल परिसरात शुक्रवारी (दि. 7) घरोघरी पूजन झाले. गौरी पूजनाचा कार्यक्रम तीन दिवस चालतो. गौराईच्या आगमनामुळे सुहासिनी माहेरी आल्याने उत्साहाला उधाण आले आहे. भाद्रपदातील शुक्ल पक्षात ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीपूजन असते म्हणून तिला ज्येष्ठागौरी म्हणतात. अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन, ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन म्हणजे दुसर्‍या दिवशी मुख्य नैवेद्य, सवाष्ण, संध्याकाळी सुवासिनींसाठी हळदीकुंकू समारंभ, रात्री फुगड़ी, जागरण मग तिसर्‍या दिवशी त्यांचे विसर्जन होते. आज शनिवारी (दि. 7) पाच दिवसांच्या गणरायांचेही विसर्जन होईल.

विविध प्रकारच्या भाज्या गोडधोड नैवेद्य दाखवून शुक्रवारी गौराईचे उत्साहात पूजन करण्यात आले. गौरी पूजनाच्या वेळी नातेवाईक व सुहासिनी जेवणाचे आमंत्रण देऊन हळदीकुंकवाने गौराईची पूजा व ओटी भरून साजरी करण्यात आली. लक्ष्मी आणि समृद्धीचे प्रतिक मानल्या जाणार्‍या गौराईचे शुक्रवारी जेवण, तर शनिवारी गणपतीबरोबर विसर्जन केले जाणार आहे. त्यांच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या गोडधोड नैवेद्याची शिदोरी दिली जाईल.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply