कर्जत : बातमीदार
तालुक्यातील शेलू येथील प्राथमिक शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी मुंबईमधील लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केली. शेलूचे उपसरपंच महेश खारीक यांनी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. त्यात 127 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन पोलीस पाटील मनोज मसणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी सरपंच दत्तात्रय पाटील, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष रामदास मसणे, नेरळ विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक हनुमंत भगत, ग्रामस्थ कृष्णा मसणे, अक्षय हिसालगे, जगदिश डांगर आदी उपस्थित होते.
लोकमान्य रुग्णालयाचे बालरोगतज्ञ डॉ. कुलदीप गजेरा, सर्जन डॉ. पात्रा, डॉ. स्नेहा चौधरी यांच्या पथकाने विद्यार्थ्यांची तपासणी केली. या वेळी काही किरकोळ आजार असलेल्या विद्यार्थ्यांना औषधेही देण्यात आली. काही विद्यार्थ्यांच्या शरीराची वाढ वयानुसार होत नसल्याचे आढळून आले. त्यांना रुग्णालयात आणून अत्याधुनिक मशिनरीच्या सहाय्याने तपासणी करून घेण्याची सूचना डॉ. गजेरा यांनी केली. अशा विद्यार्थ्यांना मुंबई येथे नेण्याची जबाबदारी महेश खारीक आणि मनोज मसणे यांनी घेतली आहे.