Breaking News

ओरायन मॉलमधील मोदक स्पर्धेत महिलांसह पुरुषांचा सहभाग

पनवेल ः वार्ताहर

नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणार्‍या पनवेलमधील ओरायन मॉलमध्ये पारंपरिक मोदक स्पर्धेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या स्पर्धेत 55 स्पर्धकांनी भाग घेतला. त्यात महिलांसह पुरुषांनी सुद्धा सहभाग घेतल्याने त्यांचे आयोजकांतर्फे कौतुक करण्यात आले.

या स्पर्धेत उपस्थित स्पर्धकांनी उकडीच्या मोदकासह काजू मोदक, चॉकलेट मोदक, दहिवडा मोदक, फळांचे मोदक, तळलेले मोदक, तिखट मोदक, पानाचे मोदक, थंडाई मोदक आदी नाना प्रकारचे मोदक आकर्षक अशी सजावट करून मांडून ठेवले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलमधील ओरायन मॉलमध्ये गणेशोत्सवानिमित्त ‘पारंपरिक मोदक’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मराठी चित्रपटसृष्टीच्या दिग्गज  सिनेतारका भेटीला आल्या होत्या. त्यामध्ये कलर्स मराठी वाहिनीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेमध्ये प्रमुख भूमिका करणार्‍या काजल मोरे, बिग बॉस रियालिटी शो मधील अभिनेत्री रूपाली भोसले, यू-टर्न वेब सिरीज काहे दिया परदेस मधील अभिनेत्री सायली संजीव आदी उपस्थित होत्या. त्यांचे स्वागत ओरायन मॉलच्या वतीने मनन परुळेकर यांनी केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मधुरा कर्णीक, द्वितीय क्रमांक सरिता नेवाळे, तृतीय क्रमांक श्रृती शहा, तर चांगले सादरीकरण म्हणून श्वेता महेश व नावीन्यपूर्ण आयोजन म्हणून रूपाली पाटील यांना विविध प्रकारची बक्षिसे

मॉलच्या वतीने देण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण विशांत शेट्टी, प्रियांका उदेशी व विजया म्हात्रे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध कुणाल रेगे यांनी केले. या स्पर्धेचे पनवेलकरांनी कौतुक केले.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply