Breaking News

घोटाळेबाज कर्नाळा बँकेवर आज ठेवीदारांचा धडक मोर्चा

पनवेल : रामप्रहर
कर्नाळा बँकेतील कोट्यवधींच्या घोटाळ्यामुळे हजारो ठेवीदार व खातेदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत बँकेचे अध्यक्ष व शेकाप नेते केवळ आश्वासने देत आहेत.
ठेवीदारांचे हक्काचे पैसे मात्र त्यांना दिले जात नाहीत, तर दुसरीकडे सरकारही याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावेत यासाठी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून गुरुवारी (दि. 13) सकाळी 10 वाजता कर्नाळा बँकेच्या पनवेल येथील मुख्य शाखेवर ठेवीदारांचा भव्य मोर्चा धडकणार आहे.
कर्नाळा बँकेत 512 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस झाला असतानाही बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार विवेक पाटील ठेवीदारांना टोलवाटोलवीची उत्तरे देत ठेवीदार, खातेदार व त्यांच्यावर अवलंंबून असलेल्या शेकडो कुटुंबीयांच्या आयुष्याशी खेळत आहेत. विवेक पाटील यांच्या या धोरणामुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. या सर्व प्रकारामुळे ठेवीदार संकटात सापडले असून, त्यांना दिलासा व न्याय देण्याच्या भूमिकेतून माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी हे कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. त्याच समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
पनवेल भाजप मध्यवर्ती कार्यालय येथून मोर्चाला सुरुवात होणार असून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा, भाजी मार्केट, शनेश्वर मंदिर, टपाल नाका असे मार्गक्रमण करून कर्नाळा नागरी सहकारी बँकेवर हा मोर्चा धडकणार आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply