पाली ः प्रतिनिधी
पाली शहरातील सर्वाधिक कळीचा मुद्दा वाहतूक कोंडीचा व अवैध पार्किंग ठरत आहे. पाली हे शहर अष्टविनायकापैकी एक क्षेत्र हे महत्त्व असले तरी या शहरात गणपतीचे देवस्थानव्यतिरिक्त पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने अडचण होत आहे. हटाळेश्वर चौक बाजारपेठ वाहतुकीचा प्रश्न नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. या परिसरात होणार्या अवैध पार्किंगमुळे रस्त्याने चालणारे पादचारी तसेच दुकानदार त्रस्त झाले असून अवैध पार्किंगमुळे दुकानदारांमध्ये भांडणेही होत असतात. रस्त्यावर अवैध दोन चाकी वाहने पार्किंगमुळे पाली शहरामध्ये वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे नागरिक वाहतूक कोंडी व अवैध पार्किंगमुळे हैराण झाले आहेत. गांधी चौक ते बाजारतळ (हटाळेश्वर चौक) या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते. या रस्त्यावर असंख्य टू-व्हीलर्स उभ्या असतात. त्यामुळे या रस्त्यावर येणार्या नागरिकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागतो. पावसाच्या दिवसांत तर अधिकच त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येते.