पनवेल : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षात जेवढा नेता महत्त्वाचा तितकाच कार्यकर्ता महत्त्वपूर्ण असतो. हा कार्यकर्ता पक्षाचा आधारस्तंभ असून, याच शक्तीच्या जोरावर आमदार प्रशांत ठाकूर यांना मोठ्या मताधिक्याने तिसर्यांदा विधानसभेत पाठवू या, अशी साद पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी घातली. त्या कळंबोली येथे बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होत्या.
पुन्हा आणू या आपले सरकार या शीर्षकाखाली पनवेल तालुका मंडलतर्फे महापालिका प्रभाग 7 आणि 8च्या बूथ कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी (दि. 27) संध्याकाळी कळंबोली येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव घरत, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, नगरसेवक अमर पाटील, नगरसेविका विद्या गायकवाड, प्रमिला पाटील, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी सरपंच अरुण पाटील, राजेंद्र शर्मा, राजेंद्र बनकर, बुधाजी ठाकूर, यशवंत ठाकूर, बबन बारगजे, संतोष बांदेकर, निशा सिंग यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
महापौर डॉ. कविता चौतमोल पुढे म्हणाल्या की, आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात केलेली प्रचंड विकासकामे आपल्या सर्वांना माहीतच आहेत. त्यांचे हे कार्य फक्त जनतेपर्यंत पोहोचविणे आपली जबाबदारी आहे. ती चोख बजावा.
आपल्या भाषणात आमदार प्रशांत ठाकूर यांनी, महापालिकेमुळे या भागाचे स्वरूप आपल्याला बदललेले दिसत असल्याचे सांगून विकासाशिवाय भाजपला काही दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने विकासाचा डोंगर उभा केला आहे. अनेक योजना जनकल्याणासाठी राबविल्या आहेत. त्यांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून देण्यासाठी सदैव कार्यरत राहा, असे सूचित केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी, कार्यकर्त्यांनी कसे काम करायला हवे आणि मतदान होईपर्यंत कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख म्हणाले की, भाजप हा शिस्तबद्ध पक्ष असून, संघटनेच्या पायावर उभा आहे. त्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळाले नसताना लोकसभेला भाजप सगळ्या जागा जिंकू शकला. त्यामुळे आपण सगळ्यांनी संघटितपणे व शिस्तीने काम केल्यास एक लाख मताधिक्याचे उद्दिष्ट सहज पार करू शकतो. तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी बूथ कार्यकर्त्यांच्या कामाचा आढावा घेतला.
कळंबोलीतून सहा हजार मतांची आघाडी देणार
आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत कळंबोलीतून 3600 मतांची आघाडी दिली. पुन्हा सर्व जण संघटितपणे जोमाने कामाला लागलो असून, कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना कळंबोलीमधून सहा हजार मतांची आघाडी मिळवून देऊ, अशी ग्वाही स्थायी समितीचे माजी सभापती व विद्यमान नगरसेवक अमर पाटील यांनी या वेळी दिली.