खोपोली ः प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीत दिवसेंदिवस कार्यकर्त्यांचा ओघ वाढतच असून, दसर्याचा मुहूर्त साधून खोपोली व खालापूर तालुक्यातील शेकाप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यांचे स्वागत जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला खोपोली पालिकेतील भाजप गटनेते तुकाराम साबळे, खोपोली संपर्कप्रमुख शरद कदम, खोपोली शहर अध्यक्ष श्रीकांत पुरी, खालापूर तालुका अध्यक्ष बापू घारे, तालुका सरचिटणीस सनी यादव, प्रसाद पाटील, खोपोली उपाध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, शहर सरचिटणीस हेमंत नांदे, दिलीप पवार, शहर युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंगुळकर, ज्येष्ठ नेते मधुकर दळवी, मीडिया सेलचे राहुल जाधव व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
शेकाप ओबीसी सेलचे खोपोली अध्यक्ष ईश्वर शिंपी तसेच मागासवर्गीय सेलप्रमुख विनोद जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोमजाईवाडी व परिसरातील सुमारे 60 शेकाप कार्यकर्ते तसेच काँग्रेस पक्षातील संभाजी पाटील, क्षितिज पाटील व सुधीर देशमुख यांनी भाजपत प्रवेश केला. पक्षप्रवेशकर्त्या शेकाप कार्यकर्त्यांत मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश होता.
खालापूर तालुक्यातही भाजपचा झंझावात दिसून आला. तालुक्यातील चिंचवली गोहे येथील शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. भाजपचे नरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली होनाडचे ग्रा. पं. सदस्य सागर रसाळ, साजगाव विभागप्रमुख हेमंत पाटील, तसेच वावोशी झाडाणी गावातील भाजपचे माथाडी नेते शशिकांत मोरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या 45 कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. सिडको अध्यक्ष भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल घालून त्यांचे स्वागत केले. सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
भविष्यात खोपोली शत प्रतिशत भाजप करण्याचा आमचा मनोदय आहे. आगामी सर्व निवडणुकांत भाजप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू. महायुतीला जिल्ह्यासह राज्यात मोठे यश मिळेल. -शरद कदम, संपर्कप्रमुख भाजप, खोपोली