Breaking News

डी-कॉकच्या अनोख्या खेळीमुळे पाक फलंदाज मुकला द्विशतकाला

जोहान्सबर्ग ः वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा खेळाडू फखर जमान याचे द्विशतक अवघ्या सात धावांनी हुकले. आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी-कॉकने ज्या पद्धतीने फखरला धावबाद केले त्यावरून वाद सुरू झाला आहे. या सामन्यात पाकचा सलामीवर फखरने 155 चेंडूंमध्ये 193 धावांची दमदार खेळी केली, मात्र या खेळीनंतरही दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पाकिस्तानवर 17 धावांनी विजय मिळवला.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. आफ्रिकेच्या संघाने निर्धारित 50 षटकांमध्ये सहा गड्यांच्या मोबदल्यात 341 धावांचा डोंगर उभा केला. पाकिस्तानच्या संघाला केवळ 324 धावांपर्यंत मजल मारता आली. शेवटच्या षटकामध्ये पाकिस्तानला विजयासाठी 30हून अधिक धावा हव्या होत्या. या षटकामध्ये फखर जमानने पहिलाच चेंडू सीमारेषेपर्यंत मारला आणि दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला, मात्र दुसरी धाव घेताना आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी-कॉकने क्षेत्ररक्षण करणार्‍या खेळाडूने चेंडू नॉन स्ट्राइकर एण्डला फेकल्याचा इशारा केला. त्यामुळे फखरने मागे वळून पाहिले, मात्र क्षेत्ररक्षण करणार्‍याने चेंडू थेट फखर धावत होता त्या दिशेने फेकत यष्ट्यांचा अचूक वेध घेतला. फखर 193 धावांवर बाद झाला.
संघाला जिंकवता आले नसते तरी फखरचा उरलेल्या चेंडूंमध्ये द्विशतक नक्कीच पूर्ण करता आले असते, असे पाकिस्तानी चाहत्यांचे म्हणणे आहे. डी-कॉकचे हे वागणे फेक फिल्डींग अंतर्गत येत असून, द. आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमालासुद्धा शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी पाकिस्तानी चाहते करीत आहेत. पाकिस्तानच्या काही आजी-माजी खेळाडूंनीही या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply