Breaking News

उरणच्या उत्कर्षासाठी घासून नाय ठासून विजयी होणार -महेश बालदी

उरण : रामप्रहर वृत्त

आमचं ठरलंय आता उरणात परिवर्तन होणारच असा निर्धार पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी व्यक्त केल्याने विरोधक हतबल झाले आहेत. त्यामुळे विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी येणार्‍या देशाच्या पंतप्रधानांना काळे झेंडे दाखविणार्‍या शिवसेनेच्या आमदारांना आज निवडणुकीत युती आठवते आणि बँकेच्या माध्यमातून 400 कोटींचा भष्ट्राचार करू पाहणारे माजी आमदार विवेक पाटील हे काँग्रेसच्या कुबड्यांचा आधार घेऊन निवडणुकीला सामोरे जात असले, तरी उरणच्या उत्कर्षासाठी घासून नाय ठासून विजयी होणार आणि आमच्या शिटीचा आवाज हा येथील कार्यकर्ता दिल्लीपर्यंत पोहचणार आहे. कारण आज जरी आमची निशाणी शिटी असली, तरी आमच्या हृदयात कमळाचे स्थान अबाधित आहे, असा आत्मविश्वास महेश बालदी यांनी व्यक्त केला.

उरण विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार महेश बालदी यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांनी उरण शहर, नवघर जिल्हा परिषद मतदारसंघात मोटारसायकल रॅलीचे आयोजन सोमवारी (दि. 14) केले होते. या रॅलीत तरुण, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीची सांगता जसखार गावातील श्री रत्नेश्वरी देवीच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत करण्यात आली. या वेळी फुंडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रशांत भोईर, जसखारचे लीलाधर भगत, सोनारी गावचे शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी जगन्नाथ कडू, अजय कुमार, डॉ. अनिल बोस, तसेच जसखार, सावरखार, पिरकोण, सोनारीसह इतर गावातील शिवसेना, शेकाप, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपत माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

या सभेला संबोधित करताना महेश बालदी यांनी पुढे सांगितले की, 2014च्या निवडणुकीत मी पराभूत होऊनही येथील जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी केंद्र, राज्य आणि जेएनपीटी बंदराच्या माध्यमातून प्रयत्न केले. त्या विकासकामांचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तीर्थरूप आप्पासाहेब धर्माधिकारी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच मंत्रिगण यांच्या हस्ते आणि आमचे मार्गदर्शक लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत केले.

हे माझ्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून जनतेला सांगत असताना येथील आमदार विकासकामांवर न बोलता मी मारवाडी म्हणून मला हिणवत माझी जातपात काढत आहेत. ते योग्य नाही. आज या आमदारांना साधा ग्रामसेवकही घाबरत नाही. त्यामुळे ते रेल्वे संदर्भात व इतर कामासंदर्भात काय बैठक बोलावणार आणि उद्या मी तोंड उघडले, तर त्यांना पळता भुई थोडी होईल, परंतु आपल्याला घाणीचं राजकारण करायचं नाही.

आपल्याला विकासाचं राजकारण करायचं आहे आणि ती शिकवण आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तीर्थरूप आप्पासाहेब धर्माधिकारी आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शिकलो आहे. तरी कार्यकर्त्यांनी सुडाचं राजकारण न करता मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्या विकासाच्या दृष्टीने आपली पावले उचलावीत. कारण आपली नाळ ही या मातीशी, जनतेशी जुळलेली आहे. त्यामुळे अब की बार एक लाख पार असा नारा उपस्थितांना शेवटी महेश बालदी यांनी देताच कार्यकर्त्यांनी एकच शिटीचा आवाज दुमदुमून सोडला.

विकासाची संकल्पना डोक्यात ठेवणारा नेता म्हणजे महेश बालदी, त्याची जातपात काढत शिवसेनेचे आमदार राजकारण करीत असतील, तर ती शिवसेना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची नाही सत्तेसाठी लाचार असणार्‍यांची आहे. आज मी तीन वेळा आमदार झालो, त्या वेळी आणि आजही आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हृदयात जपत निःस्वार्थीपणाने जनहिताची कामे करत आहे.

माझे उर्वरित जनहिताचे कार्य या परिसराचा आमदार म्हणून महेश बालदी हे करणार असले, तरी त्याच्या रूपात मीच व माझा सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार म्हणून कार्यरत राहणार आहे, असा विश्वास माजी आमदार देवेंद्र साटम यांनी व्यक्त करून महेश बालदींच्या शिटीचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचवा, असा नारा कार्यकर्त्यांना दिला.

या वेळी भाजपचे नेते पी. जे. पाटील, भाजपचे उरण उपाध्यक्ष पंडित घरत, प्रशांत पाटील, राजा पडते, संजय गायकवाड यांनी आपल्या घणाघाती भाषणातून विरोधकांचा समाचार घेतला आणि महेश बालदी यांच्यामागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. या वेळी जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत, वाहतूक सेलचे जिल्हाध्यक्ष सुधीर घरत, तालुकाध्यक्ष रवीशेठ भोईर, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, युवा नेते तथा महालण विभागाचे अध्यक्ष महेश कडू, जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, कामगार नेते सुरेश पाटील, जितेंद्र घरत, दिनेश तांडेल, तालुका चिटणीस निळकंठ घरत, सुनील पाटील, युवा मोर्चाचे अध्यक्ष शेखर तांडेल, शहराध्यक्ष कौशिक शहा, सरपंच दामूशेठ घरत, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, सरपंच पूनम महेश कडू, सरपंच ज्योती परशुराम म्हात्रे, माजी सरपंच योगेश पाटील, रविशेठ वाजेकर, समीर मढवी, प्रकाश कांबळे, दीपकशेठ भोईर, सरपंच अमित मुंगाजी, माजी उपसभापती नित्यानंद भोईर, नगरसेवक राजेश ठाकूर, माजी सरपंच गौरव कोळी, हेमंत म्हात्रे, रमेश फोफेरकर, भाजपचे उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, प्रकाश कडू, आजी-माजी नगरसेवक, सरपंचांसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply