नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
लष्करात पुढील काळात स्वदेशी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जणार आहे. यामुळे भारत पुढचे युद्ध स्वदेशात विकसित झालेल्या शस्त्रांनी लढेल आणि जिंकेलही, असा विश्वास लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी व्यक्त केलाय. भारत स्वतंत्र होऊन 70 वर्ष झाली, तरीही जगातील सर्वाधिक शस्त्रास्त्र आयात करणार्या देशांमध्ये भारत आघाडीवर आहे. ही बाब शोभणारी नाही, पण आता लवकरच ही स्थिती बदलेल. मात्र शस्त्रास्र आणि इतर यंत्रणांची निर्मिती ही भविष्यतील गरज लक्षात ठेवून झाली पाहिजे, असं रावत म्हणाले. डीआरडीओच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
भविष्यात युद्ध कसे लढले जातील. त्याचे स्वरूप कसे असेल याचा विचार केला, तर युद्ध हे आमने-सामने लढले जाणार नाही. सायबर क्षेत्र, अंतराळ, लेझर, इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि रोबोटिक्सच्या विकासासोबत आर्टिफिशल इंटेलिजन्सकडेही बघितलं पाहिजे आणि आपण आताच याचा विचार केला नाही तर खूप मागे पडू, असे रावत यांनी स्पष्ट केले.
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनापासून आपण प्रेरणा घ्यायला हवी. विज्ञानात प्रगती करून भारताला विकसित देश बनवण्याचे कलाम यांचे स्वप्न पूर्ण करू या. यासाठी स्वदेशी प्रणालीवर आधारीत तंत्रज्ञानावर काम करण्याची गरज आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. दिल्लीतील डीआरडीओ भवनमध्ये दोन दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदोरिया, नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह आणि डीआरडीओचे प्रमुख जी. सतीश रेड्डी उपस्थित होते.