Saturday , December 3 2022

झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करणार ; पालिका आयुक्तांचे शिष्टमंडळाला आश्वासन

पनवेल ः प्रतिनिधी

इंदिरानगर, लक्ष्मी वसाहत, शिवाजीनगर झोपडपट्टीवर बुधवारी पनवेल महानगरपालिकेने कारवाई करून तेथील अनधिकृत व्यावसायिक बांधकामे जमीनदोस्त केली. या वेळी त्या ठिकाणी राहणार्‍या ज्या कुटुंबांच्या झोपड्या पाडल्या, त्यांना महापालिका 15 दिवसांत नवीन झोपड्या बांधून देईल, असे आश्वासन शुक्रवारी (दि. 31) महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील

शिष्टमंडळाला दिले.

पनवेलमधून जाणार्‍या महामार्गाच्या उड्डाणपुलाच्या कामात झोपडपट्टीचा अडथळा येत असल्याने इंदिरानगर, लक्ष्मी वसाहत, शिवाजीनगर झोपडपट्टीतील अनधिकृत  व्यावसायिक गाळे बुधवारी (29 मे) जमीनदोस्त करण्यात आले. या वेळी तेथे राहणार्‍या ज्या कुटुंबांच्या झोपड्या पाडण्यात आल्या, त्या कुटुंबांची पावसाळ्यात गैरसोय होऊ नये यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सभागृह  नेते परेश ठाकूर, नगरसेवक प्रकाश बिनेदार, अ‍ॅड. मनोज भुजबळ, वृषाली वाघमारे, सुशीला घरत आणि दर्शना भोईर यांच्यासह या कुटुंबांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची सकाळी 10.30 वाजता भेट घेतली. या वेळी प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आता मोकळा श्वास घेऊ शकतो आणि त्याच्या सौंदर्यीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याबद्दल सर्वांनी आयुक्तांना धन्यवाद दिले. सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या कारवाईवेळी व्यावसायिक वापर नसलेल्या ज्या झोपड्या पाडल्या गेल्या, त्या कुटुंबांना महापालिकेने पावसाळ्यापूर्वी राहण्याची सोय करून देण्याची मागणी आयुक्तांकडे केली. महापालिका आयुक्तांनी नवनाथ नगरमध्ये या कुटुंबांना 15 दिवसांत महापालिका घरे बांधून देईल, असे या वेळी सांगितले. त्यामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबांनी समाधान व्यक्त करून आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख आणि सर्व नगरसेवकांचे आभार मानले.

Check Also

राजिपकडून जनतेला मिळणार महत्त्वपूर्ण ऑनलाइन सुविधा

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद (राजिप) प्रशासनाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या कशा सुविधा …

Leave a Reply