खारघर : प्रतिनिधी
दिवाळीपूर्वी घराची साफसफाई करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. तसाच सफाया महाराष्ट्रातून काँग्रेस पक्षाचा करा आणि 21 ऑक्टोबरला सर्वांनी मतदानाचा हक्क बजावत भाजप महायुतीला विजयी करा, असे आवाहन केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी शुक्रवारी (दि. 18) खारघर येथे केले. महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समर्थनार्थ गुजराती समाजाचा मेळावा लिटील वर्ल्ड मॉल येथील सभागृहात झाला. त्या वेळी मंत्री रूपाला
बोलत होते.
या मेळाव्यास गुजरातचे माजी गृहमंत्री गोवर्धन जडापिया, माजी मंत्री जयंतीभाई कवाडिया, माजी चेअरमन प्रवीण पटेल, कच्छ कडवा समाजाचे कांतीभाई पटेल, पाटीदार समाजाचे भांजीभाई पटेल, हसमुख कनानी, बकुळ भानुशाली, जितूभाई राजमियानी, गणेशभाई, नगरसेवक रामजी बेरा, शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, युवा नेता वैभव नाईक, अंबाभाई पटेल आदींसह समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री रूपाला म्हणाले की, गुजरातमध्ये अनेक वर्षांपासून स्थिर सरकार असल्याने आज देशभरात गुजरात मॉडेल प्रसिद्ध आहे. गुजरातमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाची गंगा आली. कच्छसारख्या दुष्काळी भागात मोदी सरकारने पाणी आणले. आज गुजरात देशभरात विकासाचे मॉडेल म्हणून ओळखले जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे भारताचे नाव आंतराष्ट्रीय पातळीवर मोठे झाले आहे. काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात विकासकामे थांबली होती. यमुना डॅमचे भूमिपूजन पंडित नेहरूंनी केले, मात्र त्याचे लोकार्पण पंतप्रधान मोदींनी केले, असे सांगून पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे. बहुसंख्येने त्यांना मतदान करीत भाजपची ताकद वाढवा, असे आवाहन रूपाला यांनी केले.
महायुतीला विजयी करा : आ. प्रशांत ठाकूर
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात पनवेल विधानसभा क्षेत्रातील पाणी, वाहतूक कोंडीची समस्या लवकरच सुटणार आहे. कोस्टल रोडचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदींनी देशात नरेंद्र व महाराष्ट्रात देवेंद्र, असा नारा दिला आहे. त्यामुळे सर्वांनी भाजप, शिवसेना महायुतीला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.