अलिबाग : प्रतिनिधी
हिंदु धर्मातील सण उत्सवात महत्वाचे स्थान असणारी महाशिवरात्र सोमवारी (दि. 4) रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरी झाली. जिल्ह्यात सर्वत्र बमबम भोलेचा गजर सुरू होता. या निमित्ताने जिल्ह्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी सकाळपासूनच शिवभक्तांची मंदिरांमध्ये गर्दी पहायला मिळत होती.
दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. मंदिरात फुलांची आरास करण्यात आली होती. अलिबाग शहरातील श्री काशीविश्वेश्वर मंदिर, उंच डोंगरावर असलेले श्रीक्षेत्र कनकेश्वर, गोरेगाव येथील श्री मल्लिकार्जून मंदिर, पेणचे श्री पाटणेश्वर, नवगाव येथील श्री बोरेश्वर मंदिर येथे भाविकांची गर्दी होती. शिवपिंडीवर दुग्धाभिषेक, बेलपत्र वाहण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. महाड शहरातील श्री विरेश्वर महाराजांच्या छबिनोत्सवाला सोमवारपासून प्रारंभ झाला. सासनकाठ्या नाचवत शहरातील विविध आळयांमधून आखाडे निघाले. सोमजाई देवीची पालखी विरेश्वरांच्या भेटीसाठी आली.
जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये अभिषेक, पुजा, भजन, किर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच बरोबर महाप्रसादाचेदेखील आयोजन करण्यात आले होते. पूजेसाठी लागणार्या साहित्याची दुकाने मंदिरांबाहेर थाटण्यात आली होती. शिवमंदिरांमध्ये शिवनामाचा गजर केला जात होता.