कर्जत : बातमीदार
अगदी ऐतिहासिक काळापासून माथेरानची शान असणारे ऐटबाज घोडे येथे येणार्या पर्यटकांच्या खास आकर्षणाबरोबर येथील दळणवळणाचे प्रमुख साधन ठरत आहे. सध्या माथेरानमध्ये उन्हाळी पर्यटनाला जोर धरू लागला आहे. पर्यटकांच्या वाढीसाठी येथील नगर परिषदेसह सामाजिक संस्थादेखील पुढे सरसावत आहेत. या वेळच्या पर्यटनाला वेगळीच रंगत आली असून दरवर्षी माथेरानमध्ये पर्यटनला येऊन आपला घोडेस्वारीचा छंद पूर्ण करणार्या हौशी पर्यटकांसाठी साहसी खेळाबरोबर गेले दोन दिवस अश्वशर्यतींचे मोठ्या दिमाखात या विकेंडमध्ये युथ सोशल क्लब आणि माथेरान नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते.
घोडेस्वारी करण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक माथेरानला भेट देत असतात. अगदी परंपरागत ठरलेला अश्व शर्यतींचा हा साहसी खेळ गेल्या 50 वर्षापासून येथे नावारूपाला आला. याची मुहुर्तमेढ माजी नगराध्यक्ष फ्रान्सिस झेव्हीअर, जिमी लॉर्ड, बाबा दिवाडकर त्यांचे चिरंजीव प्रदीप दिवाडकर, तर आता त्यांचे चिरंजीव प्रशाम दिवाडकर या युथ सोशल क्लबची धुरा सक्षमपणे संभाळत आहे. त्यांच्या सोबत माथेरानचे गटनेते प्रसाद सावंत, लक्ष्मण कदम, संदीप शिंदे, दिनेश आखाडे, अक्तर खान, किरण पेमारे, प्रकाश सुतार, विकास पार्टे, भालचंद्र सावंत असे अनेक युथ क्लबचे कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत. युथ सोशल क्लबच्या माध्यमातून अॅन्युअल स्पोर्ट्स 2019चे शानदार अयोजन करताना चॅटिंग लिप्टिंग, ट्रॉट रेस, टेंट पेकिंग, बलुन रेस, झिगझॅक असे अनेक घोड्यांच्या शर्यतींसह साहसी खेळांचे प्रकार घेण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रभरातून आलेल्या पर्यटक जॉकी, तसेच स्थानिक जॉकींनी सहभाग नोंदविला होता.
या वेळी 2019चा चॅम्पियन ऑफ द इयरसाठी यश शिंदे व अतिक महाबळे यांच्यात कडवी झुंज झाली. या दोघांचे समान गुण मिळाल्याने चिठ्ठीवर अतिकचे भाग्य उजळले व अतिक चॅम्पियन ठरला. या वेळी घोड्यांची खास सजावट स्पर्धा भरविण्यात आली होती. याचा विजेता गणेश घावरे यांचा माय लव हा घोडा ठरला. प्रेक्षकांमध्ये पर्यटक महिला, अदिवासी बांधव यांच्यासाठी चमचा लिंबू, संगीत खुर्ची, रस्सी खेच असे विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्याचबरोबर लक्की ड्रॉ स्पर्धा घेण्यात आली. या वेळी माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, मुख्याधिकारी रामदास कोकरे, नीता नेहलाणी, अडी बरूचा माजी नगराध्यक्ष प्रदीप दिवाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीबरोबर कुंडली भाग्य या हिंदी मालिकेच्या अभिनेत्याने हजेरी लावली होती.
माथेरानमध्ये या विकेंडचा शनिवार, रविवार पर्यटकांनी बहरला तर होताच, पण या घोड्यांच्या स्पर्धा पाहण्यासाठी दरवर्षी आपल्या दैनंदिन कामातून सवड काढत एक विरंगुळा म्हणून आजूबाजूच्या खेड्यांतील आदिवासी बांधवांच्या लक्षणीय हजेरीने माथेरानला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.