Breaking News

प्रगती एक्स्प्रेस सोमवारपासून पुन्हा रुळावर

कर्जत : बातमीदार

बोरघाटात पावसाळ्यात भूस्खलन व दरडी कोसळून मुंबई-पुणे रेल्वेमार्ग नादुरुस्त झाला आहे. त्याची दुरुस्ती करण्यासाठी गेल्या चार महिन्यात अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत, तर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यापैकी मुंबई-पुणे या मधील दुवा असलेली आणि पनवेलमार्गे धावणारी प्रगती एक्सप्रेस ही गाडी येत्या सोमवार (दि. 11) पासून पुन्हा रूळावर येणार आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे दुरावस्था झाल्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने  दोन महिन्यांपासून मुंबई-पुणे खंडाळा घाट सेक्शनमध्ये दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. हे काम सुमारे चार ते पाच महिने सुरु राहण्याची शक्यता आहे. या दुरुस्तीच्या कामात अडथळा येवू नये, यासाठी मध्य रेल्वेने अनेक मेल, एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या आहेत, तर काही गाड्यांचे मार्गही बदलेले आहेत. त्यामुळे पुणे, कोल्हापूर, भुसावळ, नांदेड, हुबळी, पनवेल, मुंबई इत्यादी दिशेकडून येणार्‍या आणि जाणार्‍या प्रवाशांचे हाल होत आहेत. तसेच पनवेल मार्गे एकही मेल एक्सप्रेस गाडी धावत नसल्यामुळे  नवी मुंबई, वाशी, बेलापुर, ठाणे परिसरातील शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील काम करणार्‍या चाकरमान्यांना शारीरिक, मानसिक त्रासासह आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.

 मेल, एक्स्प्रेस गाड्या बंद असल्यामुळे या मार्गावरील प्रवासी व चाकरमान्यांची होणारी गैरसोय पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष व सदस्यांनी खासदार श्रीरंग आप्पा बारणे आणि मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या निदर्शनास दिली आणि  निदान प्रगती एक्सप्रेस पुन्हा सुरु करावी, अशी मागणी केली होती. अखेर पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघाच्या प्रयत्नांना यश येऊन मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे -मुंबई – पुणे प्रगती एक्सप्रेस ही गाडी सोमवार (दि. 11) पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रगती एक्सप्रेस सुरु होईपर्यंत डेक्कनक्विन या गाडीला कर्जत रेल्वे स्थानकात एक मिनिटांचा थांबा दिला जाईल, असेही मध्य रेल्वेने कळविले आहे. पुणे- मुंबई प्रगती एक्सप्रेस पुन्हा रूळावर येणार असल्याने या मार्गावर प्रवास करणार्‍या रेल्वे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.

घाट सेक्शनमध्ये दुरुस्तीची कामे सुरू आहेत आणि त्याची गरज देखील आहे. पण महत्त्वाच्या गाड्या रद्द करून प्रश्न सुटणार नाहीत. प्रगती एक्सप्रेससारख्या गाड्या बंद ठेवू नयेत. -श्रीरंग बारणे, खासदार,मावळ

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply