नागोठणे : प्रतिनिधी
काही दिवसांत अयोध्येतील राममंदिर, बाबरी मशिदीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून जाहीर होणार आहे. नागोठण्यासह संपूर्ण विभाग शांतताप्रिय आहे, अशी आमच्या पोलीस दप्तरी नोंद असून कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी सर्वांनी जनजागृती करावी, असे आवाहन रोह्याचे डीवायएसपी किरणकुमार सूर्यवंशी यांनी नागोठण्यात केले.
अयोध्येतील लवकरच जाहीर होणार्या निकालासंदर्भात कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी येथील पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 6) दुपारी शांतता समितीची बैठक घेण्यात आली, त्यावेळी सूर्यवंशी उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. सर्वोच्च न्यायालयाकडून येणारा कोणताही निकाल सर्वांनीच मान्य करणे, हे आपले कर्तव्य राहणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
समाजात तेढ निर्माण करणारा मेसेज आला, तर फॉरवर्ड करू न देता पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावा. असे मेसेजसंदर्भात अॅडमीन तसेच फॉरवर्ड करणारे या दोघांवरही पोलीस गुन्हा दाखल करू शकतात अशी सूचना डीवायएसपी सूर्यवंशी यांनी यावेळी दिली.
अफवांवर विश्वास न ठेवता त्याची शहनिशा करणे आपले आद्य कर्तव्य आहे. ईद ए मिलाद व्यतिरिक्त कोणतीही मिरवणूक काढावयाची असल्यास पोलीस ठाण्यातून परवानगी घेणे बंधनकारक राहणार असल्याचे नागोठण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
येथील सर्वधर्मीय नागरिक आपले सण एकत्र साजरे करतात, ही येथील परंपरा आहे. सर्वोच्च न्यायालयाचा येणारा निर्णय येथील सर्वधर्मीय नागरिक मान्य करतील व समाजात कोणत्याही प्रकारची तेढ निर्माण होईल याबाबत कोणतेही आक्षेपार्ह वर्तन होणार नाही किंवा केले जाणार नाही याबाबत जागरूक राहील असे उपस्थित नागरिकांकडून आश्वासन देण्यात आले.
या सभेला निजाम सय्यद, असगर मुल्ला, संजय महाडिक, कीर्तिकुमार कळस, सुनील लाड, किशोर म्हात्रे, उद्धव कुथे, विशेष पोलीस शाखेचे निलेश महाडिक तसेच शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper