नूतन इमारतीत वर्ग भरण्यास सुरुवात
मुरुड : प्रतिनिधी
पंधरा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मुरुड येथील औद्योगीक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सोमवारी (दि. 11) नवीन स्वतंत्र इमारतीत स्थलांतरीत झाली आहे. मुरुड आयटीआय गेल्या 15वर्षापासून शहरातील सर एस. ए. हायस्कूलच्या एका हॉलमध्ये सुरू होते. दरम्यान, शहरातील एका टेकडीवर असलेल्या दत्त मंदिराच्या परिसरात या आयटीआयची नवीन व स्वतंत्र इमारत उभारण्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला होता. त्यातून मागील 10वर्षांपासून या इमारतीचे काम सुरु होते. कधी निधीची चणचण तर कधी ठेकेदारांकडून विलंब या कारणामुळे या इमारतीचे काम रखडले होते. मात्र अनेक समस्यांवर मात करीत अखेर या इमारतीचे काम पूर्ण झाले आणि सोमवारपासून या नुतन इमारतीत आयटीआयचे कामकाज सुरु झाले आहे. दत्त मंदिर टेकडी परिसरातील नुतन इमारतीमध्ये 12 वर्ग खोल्या असून वर्कशॉप, लॅब असे मोठे हॉल आहेत.16 सिसिटीव्ही लावण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय आहे, महावितरणकडून लौकरच ट्रान्सफार्मर बसविण्यात येणार आहे. सध्या येथे फक्त तीन कोर्सचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याने विद्यार्थी संख्या कमी आहे, मात्र पुढील काळात अजून सहा कोर्स सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती आयटीआयचे अधिकारी संजय सदामाते यांनी दिली. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मुरुड आयटीआयला स्वतंत्र इमारत मिळून तिथे विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण सुरु झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.